व्यवस्थापन बदलले तरी कामगार कायम राहणार
By admin | Published: July 17, 2016 12:33 AM2016-07-17T00:33:55+5:302016-07-17T00:33:55+5:30
बल्लारपूर पेपरमिल जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. १९५२ सालापासून हा उद्योग थॉपर उद्योगसमूह चालवित होता.
नरेश पुगलिया : जुलै अखेर कामगारांना सुपर बोनस मिळणार
बल्लारपूर : बल्लारपूर पेपरमिल जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. १९५२ सालापासून हा उद्योग थॉपर उद्योगसमूह चालवित होता. परंतु या उद्योगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे कामगारांचे वेतन थकले आहे. चालू जुलै महिन्याअखेर कार्यरत कामगारांना सुपर बोनसचे वितरण करण्यात येणार असून पेपर मिलचे व्यवस्थापन बदलले तरी कार्यरत कामगार कायम राहतील, असे आश्वासन बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पेपर मिलच्या द्वारसभेत शनिवारला कामगारांना दिले.
बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेच्या वतीने मजदूर कार्यालयासमोरील प्रांगणात कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने द्वारसभा शनिवारी पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, मजदूर महासंघाचे सचिव वसंत मांढरे, कार्याध्यक्ष तारासिंग कलसी, अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, न.प. गटनेते देवेंद्र आर्य, रामदास वाग्धरकर यांच्यासह मजदूर सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुगलिया म्हणाले, बल्लारपूर पेपर मिलला २००४ ते २०१४ पर्यंत कच्चा माल म्हणून बांबू पुरवठ्याचा करार तत्कालीन राज्य शासनाशी करण्यात आला होता. मात्र तो करार संपुष्टात आल्यानंतर विद्यमान राज्य सरकारने कच्चा माल पुरवठ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी पेपर मिल उद्योगाचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. आज पेपर मिलवर १६ हजार कोटींचे कर्ज थकीत असल्यामुळे कामगारांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. या उद्योगात एक ते सात मशिनच्या माध्यमातून लाखो टन कागदाची निर्मिती केली जाते. उत्पादित केलेला माल विकला जातो. परंतु कर्ज घेतल्यामुळे बँक परस्पर कर्जाची रक्कम कपात करीत असल्याने नाईलाजास्तव कामगारांना दोन ते तीन महिने वेतनासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यावर व्यवस्थापनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले असून सुपर बोनस या महिन्यात देण्यासाठी व्यवस्थापनाला भाग पाडू, असेही पुगलिया म्हणाले.
सभेचे संचालन वसंत मांढरे यांनी केले तर आभार तारासिंग कलसी यांनी मानले. यावेळी या सभेला कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)