‘एका मनस्विनीचे चिंतन’ डोळ्यात अंजन घालणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 02:29 PM2019-03-19T14:29:33+5:302019-03-19T14:30:00+5:30
जया द्वादशीवार यांनी महाराष्टष्ट्रच्या राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन केले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार लिखित ‘चिंतन एका मनस्विनीचे’ ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धर्म व जातीने विखुरलेल्या समाजव्यवस्थेला विधायक वळण देण्याचे काम राजकारण्यांसाठी तसे कठीण असते. लेखक विचारवंतच हे काम अगदी निष्ठेने करू शकतात. विवेकी लेखक मंडळी सत्तेला उभे करतात आणि कोसळवू शकतात. जया द्वादशीवार यांनी महाराष्टष्ट्रच्या राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन केले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार लिखित ‘चिंतन एका मनस्विनीचे’ ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडलेल्या समारंभाप्रसंगी मंचावर डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंंदा आमटे, साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट, डॉ. श्रीकांत तिडके, सत्कारमूर्ती सेवाग्राममधील नई तालिमच्या संचालक सुषमा शर्मा, आनंदवनचे ज्येष्ठ रूग्णसेवक डॉ. बाबा पोळ आदी उपस्थित होते.
माजी गृहमंत्री शिंदे म्हणाले, डॉ. जया द्वादशीवार यांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी इतकी संवेदनशिल होती याची मी कल्पनाही करू शकत नाही. ‘चिंतन एका मनस्विनीचे’ या पुस्तकातून देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक घटना आणि साहित्य कलाकृतींची अत्यंत गांभिर्याने चिकित्सा केली आहे. महाराष्ट्रला लेखक-पत्रकारांची फार मोठी परंपरा लाभली आहे. राजकीय नेतृत्व चुकत असेल तर त्यांचे कान धरण्याचे काम पत्रकारांचे आहे. जयातार्इंनी आमच्या सोलापूर जिल्ह्यातील डॉ. किशोर शांताबाई काळे, डॉ. शरणकुमार लिंबाळे या दोन लेखकांच्या पुस्तकांचीही आपल्या ग्रंथात दखल घेतली. त्यांचे लेखन सतत प्रेरणा देणारे आहे. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नवीन पिढीला जयातार्इंच्या नावाने पुरस्कार देण्याची परंपरा निर्माण केली. या पुरस्कारातून नव्या पिढीला सेवा कार्याची उब मिळणार आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असताना सोलापूर येथून मी चंद्रपुरात आलोय. माझा दिवस वाया गेला नाही. या कार्यक्रमातून मी प्रेरणा घेऊ न चाललो आहे, असेही माजी गृहमंत्री शिंदे म्हणाले. द्वादशीवार कुटुंबीयांतर्फे डॉ. प्रकाश आमटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, संचालन माधवी भट यांनी केले. नंदू नागरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश गांधी, माजी मंत्री शोभा फडणवीस, माजी खासदार नरेश पुगलिया, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, राजुराचे नगराध्यक्ष अरूण धोटे, डॉ. रजनी हजारे, शोभा पोटदूखे, डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, अरूणा सबाने आदींसह चंद्रपूर व नागपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जमिनीवर पाय ठेवणारी लेखिका
जया द्वादशीवार यांच्या ग्रंथावर विनोद शिरसाठ व डॉ. श्रीकांत तिडके यांनी भाष्य केले. समग्र लेखन अत्यंत प्रगल्भ विचारांचे निदर्शक असून माहिती व भाष्य यातून जयातार्इंचे चिंतन सुरू होते. ‘जमिनीवर पाय ठेवणारी लेखिका’ अशी नोंद शिरसाट यांनी केली. लेखनात विविधता आहे. यातील साहित्य व समीक्षा अर्धविराम नाही तर पूर्णविराम आहे. बा. सी. मर्ढेकरांचा लयसिद्धांत लेखिकेने मान्य केला आहे. स्त्री लेखिकांची अभिव्यक्ती, आशय कडक असावी. मराठी स्त्री साहित्यात धीटपणा नाही, असा निष्कर्ष लेखिकेना मांडला तो वास्तवदर्शी असल्याचे डॉ. तिडके यावेळी म्हणाले.
सेवावर्तींना पुरस्कार प्रदान
महात्मा गांधीप्रणित सेवाग्राम आश्रमात नई तालिम संकल्पनेनुसार मुलांना शिक्षण देणाऱ्या सुषमा शर्मा, आनंदवनचे ज्येष्ठ रूग्णसेवक डॉ. बाबा पोळ यांना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जया द्वादशीवार सेवा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रूपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रोटी फुड बँक चालविणारे राजु चोरिया यांना डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते रोख ५० हजार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मुल येथील महम्मद जिलानी यांना मानचिन्ह व वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला साड्या भेट देण्यात आल्या. सत्कारमुर्तींनी मनोगत व्यक्त केले.