मानोऱ्यातील आरोग्य उपकेंद्र सहा महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:10 AM2018-04-12T01:10:00+5:302018-04-12T01:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मानोरा येथील आरोग्य उपकेंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मानोरा उपकेंद्राने जिल्ह्यात सर्वाधिक बाळंतपण केल्याने या उपकेंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्यात आला होता. परंतु, सध्या या उपकेंद्रात स्थायी कर्मचाºयांची वानवा असून चार पदांपैकी चारही पदे रिक्त आहेत. या उपकेंद्राचा प्रभार पळसगाव येथील आरोग्य सेविकेकडे देण्यात आला. पण, त्या उपकेंद्रात जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून आरोग्य केंद्र कुलूपबंद आहे. उपकेंद्रच बंद राहत असल्याने मानोरा परिसरातील रुग्णांना कोठारी, बल्लारपूर व चंद्रपुरातील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. गरोदर महिलांचे तर हाल सुरू आहेत. या उपकेंद्रात सुसज्ज इमारत असून कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थान बांधण्यात आले. आरोग्य उपकेंद्र व कर्मचारी निवासाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या उपकेंद्रात पूर्णवेळ कर्मचारी व डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे.
मानोरा येथील आरोग्य उपकेंद्र सहा महिन्यांपासून बंद असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रिक्त पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही. या उपकेंद्रात स्थायी कर्मचारी पाठवून मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी.
- विजय बुरांडे, ग्रा.पं. सदस्य, मानोरा.
आरोग्यसेविका सध्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी नागपूर येथे गेल्या आहेत. त्यामुळे या उपकेंद्राचा कार्यभार पळसगाव येथील आरोग्य सेविकेकडे देण्यात आला आहे. उपकेंद्रात दोन पदे रिक्त आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोपात तथ्य नसून उपकेंद्र सुरूच आहे.
- डॉ. इकबाल शेख,
प्राथमिक आरोग्य केंद्र, कोठारी