मनपाच सांगते नियम कसे मोडायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:30+5:302021-03-26T04:27:30+5:30
रिॲलिटी चेक चंद्रपूर : शहर स्वच्छ, सुंदर तसेच नीटनेटके ठेवण्याची प्रत्येक नागरिकांसह महापालिकेचीही जबाबदारी आहे. मात्र नागरिकांसह महापालिकाही याकडे ...
रिॲलिटी चेक
चंद्रपूर : शहर स्वच्छ, सुंदर तसेच नीटनेटके ठेवण्याची प्रत्येक नागरिकांसह महापालिकेचीही जबाबदारी आहे. मात्र नागरिकांसह महापालिकाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, अनधिकृत होर्डिंग लावण्यासंदर्भात नुकतीच महापौरांनी बैठक घेतली. मात्र यानंतरही शहरातील होर्डिग्ज हटले नाही. उलट महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत वीज खांबाचा आधार घेत जागोजागी होर्डिग्ज लावून नियम कसे मोडायचे हे सामान्य नागरिकांना दाखवून दिले आहे.
शहराचे विद्रूपीकरण होणाऱ्या होर्डिंग्ज लावण्यासंदर्भात न्यायालयाचे आदेश आहे. मात्र महापालिकेकडून सातत्याने नियमाचे उल्लंघन केले जात आहे. चंद्रपूर शहरातील विविध चौकात फेरफटका मारला तर जागोजागी असे होर्डिग्ज लावण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, मोठमोठ्या वृक्षांना खिळे मारून हो़र्डिंग लटकवण्यात आले आहे. सोबतच वीज खांब तर अनधिकृत होर्डिंगची हक्काची जागा अशीच काहीशी अवस्था शहरात बघायला मिळत आहे. भरीस भर महापालिका प्रशासनही या होर्डिंगला मूकसंमती देत असून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील बहुतांश चौकामध्ये वीज खांबालाच होर्डिंग्ज लावून महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे.
बाॅक्स
दिव्याखाली अंधार
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीमध्ये महापौरांनी शहरातील हाेर्डिंग्जवर कार्यवाही करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शहरातील एक, दोन ठिकाणचे होर्डिंग्ज काढण्यात आले. मात्र महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत जनजागृतीसाठी शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावले आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर कार्यवाही करण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने प्रथम आपल्या दिव्याखालील अंधार दूर करावा, अशी मागणी आता पुढे येत आहे.
बाॅक्स
हा घ्या पुरावा
शहरातील सपना टाॅकीज चौक, जटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, महापालिकेचे वाहनतळ, मिलन चौक, आंबेडकर चौक, जयंत टाॅकीज चौक, वरोरा नाका चौक, वडगाव चौक, दाताळा मार्गावरील चौकामध्ये अनेक ठिकाणी परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. त्यामुळे या होर्डिंग्जवर कारवाई कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाॅक्स
वीज खांब हक्काची जागा
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लागले आहे. यामध्ये महापालिकेचाही सहभाग आहे. यातील बहुतांश होर्डिंग्जला वीज खांबाचा आधार घेण्यात आला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
बाॅक्स
कार्यवाही करू
अनधिकृत होर्डिंगसंदर्भात अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे यांना विचारणा केली असता, होर्डिंग्जची परवानगी वेगळा विभाग देतात. अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम आमचे आहे. यासाठी लवकरच एजन्सी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
वीज खांब ही महावितरणची मालमत्ता आहे. त्यामुळे वीज खांबांवर होर्डिंग्ज लावणे चुकीचे आहे. अनेकवेळा कारवाई केली जाते. मात्र मनुष्यबळाअभावी प्रत्येकवेळा कार्यवाही होत नाही. महापालिकेने परवानगी देताना तपासले पाहिजे तसेच असे होर्डिंग्ज काढले पाहिजे.
- उदय परासखानेवाला
कार्यकारी अभियंता, वीज परिमंडळ, चंद्रपूर