स्वच्छतेसाठी मनपाची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:25 PM2017-12-23T23:25:41+5:302017-12-23T23:25:56+5:30
सध्या स्वच्छ भारत अभियान देशभरात मोठ्या जोमात राबविण्यात येत आहे. चंद्रपूर मनपानेही स्वच्छता अभियानात पावलावर पाऊल उचलणे सुरू केले आहे. स्वच्छता अभियानात संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूरला पहिले स्थान मिळावे, यासाठी मनपाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या स्वच्छ भारत अभियान देशभरात मोठ्या जोमात राबविण्यात येत आहे. चंद्रपूर मनपानेही स्वच्छता अभियानात पावलावर पाऊल उचलणे सुरू केले आहे. स्वच्छता अभियानात संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूरला पहिले स्थान मिळावे, यासाठी मनपाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. शहरात ठिकठिकाणी ‘चंद्रपूर स्वच्छ होतेय’चे फलक लावून सकारात्मक उर्जा तयार करण्यात येत आहे.
लोकसंख्या वाढीमुळे सध्या चंद्रपूर झपाट्याने बदलत आहे. स्वच्छतेतही चंद्रपूर मागे राहू नये, म्हणून मनपानेही धावपळ सुरू केली आहे. चंद्रपूरकरही आता स्वच्छतेबाबत सजग झाल्याचे दिसून येत आहे. घरोघरी असलेला ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात आहे. डम्पींग यार्डमध्ये ओला व सुका कचरा एकत्रित टाकला जाऊ नये म्हणून नागरिकांनाही ओला व सुका कचरा वेगळा करण्याकरिता हिरवा व निळा, असे दोन डस्टबीन वाटप करण्यात आले आहे. यासोबतच काही प्रभागात कचºयापासून खत निर्मितीही केली जात आहे. एकत्रित झालेल्या कचºयामधून माती, गिट्टी, मोठे दगड व प्लॅस्टिक वेगवेगळे करण्याकरिता मशिन लावण्यात आली आहे.
दुकानदार व मोठे व्यावसायिक यांच्याकडील वेस्ट मटेरियल व पॅकींग बॉक्स एका विशिष्ट ठिकाणी जमा करून ते कचरा गाडीने डम्पींग यार्डवर नेले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा उकीरड्यावर दिसणारे घाणीचे साम्राज्य आता कमी होत आहे.
स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांनाही कळावे, त्यांच्या याविषयी सकारात्मक उर्जा निर्माण व्हावी, यासाठी शहरात ठिकठिकाणी नागरिकांचेचे छायाचित्र टाकून ‘चंद्रपूर स्वच्छ होतेय’ असे फलक लावण्यात आले आहे. चंद्रपुरातील मुख्य मार्गांच्या मधोमध जयंत टॉकीजजवळ चंद्रपूर स्वच्छ होत आहे, हे सांगणारा मोठा ‘बलून’ हवेत अडविण्यात आला आहे.
डम्पींग यार्डचे सौंदर्यीकरण
कंम्पोस्ट डेपोमध्ये कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी काही उपाययोजना न केल्याने स्वच्छ भारत अभियानात चंद्रपूर मनपाला कमी गुणांकन मिळाले होते. त्यामुळे आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अभियंता महेश बारई यांच्या मार्गदर्शनात या डेपोमधील कचºयाच्या मोठ्या ढिगाºयांचे सपाटीकरण करण्यात आले आहे. डम्पींग यार्डचे सौंदर्यीकरण व त्या ठिकाणी एक मोठे उद्यान निर्माण करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या आहेत. डम्पींग यार्डमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी काही नागरिकांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे. दरम्यान, शुक्रवारी महापौर अंजली घोटेकर यांनी कंम्पोस्ट डेपो स्थळाची पाहणी करीत मनपा अधिकाºयांना स्वच्छतेबाबत काही सूचना दिल्या आहेत.
५० ते ६० टक्के कचरा आपण घरात जिरऊ शकतो. परंतु त्यासाठी तशी मानसिकता असणे गरजेचे आहे. आपल्या पुढील पिढीचे आयुष्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी मिळून उत्तम पर्यावरणाकरिता प्रयत्न करावे. वृक्षाची लागवड करावी. आपले शहर स्वच्छ व हिरवे करावे. सर्व नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा.
-अंजली घोटेकर, महापौर, चंद्रपूर महानगरपालिका.