मॅन्युअल टायपिंगलाच विद्यार्थ्यांची अधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:42+5:30
संगणक टायपिंग सुरू करून मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याचा निर्णय नोव्हेंबर-२०१७ मध्ये शासनाने घेतला होता. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार दोन वर्ष मुदतवाढ मिळाली होती. संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, याबाबत संघर्ष समितीने शासन दरबारी प्रभावी बाजू मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संगणक टंकलेखन या महागड्या कोर्सपेक्षा मॅन्युअल अभ्यासक्रम हा गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे. तर संगणक टंकलेखनातील अडचणी लक्षात घेता, विद्यार्थ्यांना मॅन्युअल टंकलेखनाकडे ओढा कायम आहे. त्यामुळे मॅन्युअल टायपिंग कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये मॅन्युअल टंकलेखन उपलब्ध असल्याने आणि नोकरीची संधी असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत आहेत.
सन २०१७ मध्ये मिळालेली दोन वर्षांसाठीची मुदतवाढ येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. तथापी, मॅन्युअल टंकलेखन कायमस्वरूपी सुरू राहावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मॅन्युअल टंकलेखन व संगणक टंकलेखन संघर्ष समितीने शिक्षणमंत्र्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम बंद केल्यास लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी आर्थिकदृष्ट्या भुर्दंडही सहन करावा लागणार आहे.
संगणक टायपिंग सुरू करून मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याचा निर्णय नोव्हेंबर-२०१७ मध्ये शासनाने घेतला होता. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार दोन वर्ष मुदतवाढ मिळाली होती. संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, याबाबत संघर्ष समितीने शासन दरबारी प्रभावी बाजू मांडली. दरम्यान मिळालेली मुदतवाढ ही गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरली. संगणक (जीसीसी, टीबीसी) टायपिंग कोर्स हा तांत्रिक व अन्य समस्यांच्या विळख्यात आहे. या व इतर बाबी लक्षात घेता मॅन्युअल टंकलेखन कायम ठेवणे आवश्यक आहे.
शासकीय नोकर भरतीमध्ये संगणक (जीसीसी, टीबीसी) टायपिंग अभ्यासक्रमाला संगणक अर्हता म्हणून मान्यता नाही. अशावेळी आगाऊ शुल्क घेण्याचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिल्लीसह १२ राज्यात मॅन्युअल टायपिंग सुरू असल्याची बाब समितीने मांडली आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थीही संगणक टायपिंगपेक्षा मॅन्युअर टायपिंगलाच अधिक पसंती देत आहे. जिल्ह्यातील बहुतांश टायपिंग इन्स्टिट्युटमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी बघायला मिळत आहे.
या आहे अडचणी
संगणक टायपिंगमध्ये विविध अडचणी असल्याने विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त भर हा मॅन्युअल टायपिंगकडे आहे. संगणक टायपिंगकरिता नि:शुल्क सॉप्टवेअर उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना यामुळे अवैध सॉफ्टवेअरचा सराव करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होत आहे. मॅन्युअल टायपिंगचे शुल्क विद्यार्थ्यांना परवडणारे आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी आॅब्जेक्टिव्ह ३०, ४० श.प. मि.यात विद्यार्थ्यांना वारंवार आॅब्जेक्टिव्ह वाचावे लागत आहे.