अनेक रुग्णवाहिकांची आरटीओत नोंदच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:40+5:30
चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे अनेकजण खासगी रुग्णवाहिकांच्या व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायात सेवाभाव असल्याने ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. जेवढ्या जास्त रुग्णवाहिका असेल तेवढेच रुग्णांसाठी चांगले आहे. मात्र खासगी रुग्णवाहिका सांभाळताना अनेक नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘जिल्ह्यात रुग्णवाहिकांची दुकानदारी तेजीत’ अशा आशयाचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी दवाखाना परिसरात याच वृत्ताची चर्चा होती. सोशल मीडियावरूनही लोकमत वृत्ताचे कौतुक करीत त्यांना रुग्णवाहिकांबाबत आलेल्या वाईट अनुभवाची गाथा सांगितली. दरम्यान, खासगी रुग्णवाहिकांबाबत आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जिल्ह्यात फिरणाऱ्या अनेक रुग्णवाहिकांची आरटीओ कार्यालयात रुग्णवाहिका म्हणून नोंद नसल्याचीही माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे अनेकजण खासगी रुग्णवाहिकांच्या व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायात सेवाभाव असल्याने ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. जेवढ्या जास्त रुग्णवाहिका असेल तेवढेच रुग्णांसाठी चांगले आहे. मात्र खासगी रुग्णवाहिका सांभाळताना अनेक नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होत नाही. खासगी रुग्णवाहिका म्हणून आरटीओ कार्यालयात केवळ ४१ रुग्णवाहिकांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात शंभरावर खासगी रुग्णवाहिका जिल्ह्यात धावत आहेत. यातील अनेक रुग्णवाहिकांची आरटीओ कार्यालयात नोंदच नाही. केवळ चारचाकी वाहन म्हणून या रुग्णवाहिकांची नोंद असल्याचीही माहिती आहे. रुग्ण नसताना अशा रुग्णवाहिकांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
चालकांना प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण हवे
रुग्णवाहिकेच्या चालकांना आरोग्यासंबंधी प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणे अपेक्षित आहे. काही तातडीच्या वेळी चालक रुग्णाची व रुग्णवाहिकेतील साहित्याची काळजी घेऊ शकला पाहिजे, यासाठी हे प्राथमिक प्रशिक्षण हवे असते. मात्र अनेक रुग्णवाहिकेच्या चालकांना असे प्रशिक्षण देण्यात येत नाही.
१०८ रुग्णवाहिकेचा कारभार पारदर्शक-बीव्हीजी
१०८ क्रमांक लावताच तत्काळ रुग्णाला रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. १०८ क्रमांकावर फोन लावताच तो कॉल थेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर पुणे येथे जातो, थेट रुग्णवाहिकेच्या चालकाकडे नाही. त्यामुळे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकाचे खासगी चालकासोबत कुठलाही व्यवहार नसतो, असे बीव्हीजीने स्पष्ट केले आहे. यासोबतच रुग्णवाहिका जीपीएस प्रणालीद्वारे जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका कुठे जाते, हेदेखील कळते असते, असेही त्यांनी ‘लोकमत’ला पाठविलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे.
कोणत्याही रुग्णाची लूट नाही- रुग्णवाहिका संघटना
’लोकमत‘मध्ये ‘जिल्ह्यात रुग्णवाहिकांची दुकानदारी तेजीत’ या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच खासगी रुग्णवाहिका चालकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही चालकांनी लोकमत कार्यालयात येऊन आपली बाजु मांडली. खासगी रुग्णवाहिका चालक आजारी, गरजू नागरिकांना तत्काळ रुग्णवाहिका सेवा पुरवतात, यातून त्यांना मदत करणे हे हेतू असतो. सोबतच चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यातून करतो. यात जादा पैसे उकळून कोणत्याही रुग्णाची लूट केली जात नाही, असे प्रायव्हेट रुग्णवाहिका चालक, मालक संघटनेने स्पष्ट केले. रुग्णांसोबत सेवाभाव वृत्तीच ठेवली जाते. एखादा चालक रुग्णाची लूट करताना आढळल्यास संघटनेमार्फत त्यावर तोडगा काढला जाईल, असे संघटनेने लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
रुग्णवाहिका चालकाला कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा नियम नाही. गंभीर रुग्ण असेल तर रुग्णवाहिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व इमर्जन्सी सोईसुविधा पुरविल्या जातात.
- एस. एस. मोरे,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.