‘तो’ ठराव पटलावर येण्याची अनेकांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:37+5:302021-09-16T04:34:37+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : सध्या नागभीड येथे एका प्रस्तावित दारू दुकानाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या दुकानाच्या मंजुरीचा ठराव ...
घनश्याम नवघडे
नागभीड : सध्या नागभीड येथे एका प्रस्तावित दारू दुकानाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या दुकानाच्या मंजुरीचा ठराव नगरपरिषद सभेच्या पटलावर केव्हा येतो, याकडे नागभीड नगरपरिषदेच्या अनेक नगरसेवकांना प्रतीक्षा लागून असल्याची चर्चा नगरपरिषद वर्तुळात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर, अनेक दारू दुकानदारांनी आपले लक्ष नागभीडवर केंद्रित केले आहे. नागभीड हे शहर पूर्व विदर्भातील तीन चार जिल्ह्यांना मध्यवर्ती असल्याने आणि त्याचबरोबर येथे असलेले रेल्वे जंक्शन व येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे प्रवाशांची वर्दळ हे यामागील कारण असावे. म्हणूनच नागभीड व नागभीड परिसरात दारू दुकानासाठी अनेकांच्या आजही हालचाली सुरू आहेत. अशाच एका दारू दुकानदाराने नागभीड येथे एक घर भाड्याने घेऊन आणि या घराचे उर्वरित बांधकाम शीघ्र गतीने करून, दारू दुकान सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
मात्र, या दुकानासाठी या दुकानदाराने नगरपरिषदेकडून परवानगी घेतली की नाही, हे मात्र गुलदस्त्यात आहे. चर्चा तर अशी आहे की, विशेषाधिकारात या दुकानास परवानगी बहाल करण्यात आली आहे. मात्र, अनेक नगरसेवकांचा यावर विश्वास नाही. परवानगीचा विषय सभेत आलाच नाही, तर दुकानास देण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा समज करून घेऊन यातील काही नगरसेवक तर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करून खात्री करून घेण्याचा प्रयत्न करून घेत असले, तरी अधिकारी घुमवून फिरवून उत्तर देत असल्याने, या नगरसेवकांची चांगलीच कोंडी होत असल्याची माहिती एका नगर सेवकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळेच सभेत ठराव येण्याची प्रतीक्षा करीत असलेले हे नगरसेवक चांगलेच द्विधा अवस्थेत सापडले आहेत.
बॉक्स
कार्यकाळ लवकरच संपुष्टात
नागभीड नगर परिषदेच्या कार्यकाळाचे आता ‘उत्तरायण’ सुरू आहे. येत्या मे महिन्यात या नगरपरिषदेची निवडणूक प्रस्तावित आहे. म्हणूनच आता प्रत्येकाला जमेल तेवढी बाजी मारून घेण्याची घाई झाली आहे. या घाईचाच एक भाग म्हणून नागभीड येथील प्रस्तावित दारू दुकानाच्या परवानगीचा ठराव नगरपरिषद सभेच्या पटलावर येण्याची प्रतीक्षा असल्याच्या शहरात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
150921\img-20210915-wa0014.jpg
नागभीड नगर परिषदेची इमारत