बियाणे न उगविल्याच्या अनेक तक्रारी
By admin | Published: July 10, 2016 12:36 AM2016-07-10T00:36:45+5:302016-07-10T00:36:45+5:30
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच...
महाबीजची बियाणे : शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत
वरोरा: तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच महाबीज कंपनी व कृषी विभाग खङबडून जागे झाले. आता पुन्हा अनेक शेतकऱ्यांनी आपणही घेतलेले महाबीजचे बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. दिवसागणिक तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
वरोरा तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजने अंतर्गत अनेक गावातील शेतकऱ्यांना दोन बॅग महाबीज सोयाबीन बियाणे पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी महाबीज सोयाबीन बियाण्यांवर अनुदान मिळत असल्याने कृषी केंद्रातून महाबीजचे सोयाबीन बियाणे ेविकत घेवून शेतात पेरणी केली. यामध्ये वरोरा तालुक्यातील एकट्या भेंडाळा गावातील १२३ शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. याबाबत तालुका कृषी विभागाने तातडीने संबंधित शेताला भेट देवून पंचनामे करणे सुरु केले आहे. यासोबत साखरा गिरोला, चारगाव, पिंपळगाव आदी गावातील काही शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे देणे सुरु केल्याने कृषी विभाग व महाबीज कंपनीचे प्रतिनिधी तक्रारी बघून अवाक झाले आहेत. तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतात जावून पाहणी सुरु केली आहे. नगदी समजले जाणारे सोयाबीेनची उगवन झाली नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून यामुळे त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे. परिणामी शेतकरी पूर्णत: हताश झाला असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
अतिपावसाचा हास्यास्पद दावा
२७ व २८ जून दरम्यान शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांची पेरणी केली. याच कालावधीमध्ये त्याच गावातील इतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले. त्यांची उगवन मोठ्या प्रमाणात झाली. २९ जूनला खूप पाऊस परिसरात झाला. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगविले नाही, असा दावा तज्ज्ञांनी केला. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास महाबीज वगळता इतर कंपनीच्या बियाण्यांची कशी उगवन झाली, यावर ते निरुत्तर झाले. त्यामुळे अतिपावसाचा दावा हास्यस्पद ठरला असल्याचे दिसून येत आहे.