चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:40 PM2017-11-05T23:40:23+5:302017-11-05T23:40:36+5:30
चिमूर विधानसभा क्षेत्रात जेवढे काम गेल्या ६० वर्षात झाले नाही ते केवळ ३ वर्षाच्या कार्यकाळात आपण करून दाखविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्रात जेवढे काम गेल्या ६० वर्षात झाले नाही ते केवळ ३ वर्षाच्या कार्यकाळात आपण करून दाखविले आहे. चिमूर मतदार संघात ३ हजार कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत, असे प्रतिपादन आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.
चिमूर तालुक्यातील गोरवट येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गोसेखुर्दचे पाणी गोरवट-मोटेगावसह आसपासच्या २८ हजार हेक्टर जमीनीच्या सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. पुढील दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
गोरवट-मोटेगाव रस्त्यासाठी ८० लक्ष रूपये खनिज निधीतून मंजूर करण्यात आले असून लवकरच हा रस्ता पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण मतदार संघ चुलमुक्त-धूरमुक्त करण्याचा संकल्प केला असून गोरवट येथील ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून भाजप पदाधिकाºयांना द्यावे. ८ डिसेंबरला पंतप्रधान उज्वला योजनेतून केवळ १०० रूपयात गॅस कनेक्शन देण्यात येईल, असे आ. भांगडिया यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वारजुकर, डॉ. श्याम हटवादे, जि.प. सदस्य मनोज मामीडवार, माजी पं. स. सदस्य विलास कोराम, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर मुंगले, आदिवासी विविध कार्यकारी संस्था मोटेगावचे अध्यक्ष महादेव दोडके, संजय राचलवार, दिनेश श्रीरामे, युवराज श्रीरामे, पैकुजी नन्नावरे, विशाल ढोक, ईश्वर दडमल आदी उपस्थित होते.