जम्बो लसीकरणात अनेकांना जावे लागले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:14+5:302021-05-14T04:27:14+5:30
फोटो वरोरा : ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास गुरुवारी सुरुवात झाली. वरोरा शहरातील दोन्ही लसीकरण ...
फोटो
वरोरा : ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास गुरुवारी सुरुवात झाली. वरोरा शहरातील दोन्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांनी एकच झुंबड केल्याने गोंधळ निर्माण झाला. रात्रभर जागरण करूनही लसीचा डोस मिळाला नाही व सकाळी हिरमुसला चेहऱ्याने अनेकांना परत जावे लागेल.
वरोरा शहरातील उपजिल्हा रुग्णालय आणि हिरालाल लोया विद्यालयात कोविशिल्ड या कोरोना लसीचा दुसरा डोस गुरुवारी देणार असल्याचे जाहीर झाले. अनेकांचे लक्ष याकडे लागले होते. पहिला डोस घेऊन सहा आठवड्याच्या वर कालावधी लोटल्यामुळे दुसरा डोस तातडीने मिळावा, याकरिता गुरुवारच्या मध्यरात्रीपासून नागरिक दोन्ही लसीकरण केंद्रावर रांगेत लागले होते. टोकन मिळेल आणि आपल्याला लस टोचली जाईल, या आशेने ते उभे असतानाच, लस देण्याची कार्यवाही ही ज्या नागरिकांनी पहिला डोस वरोरा भागात घेतला आहे, त्यांनाच मिळेल असे प्रशासनाने जाहीर केले. तसेच दुसऱ्या डोस करता पात्र व्यक्तींची यादी सुद्धा वरिष्ठ कार्यालयांकडून प्राप्त झाल्याने त्यांनाच दुसरा डोस गुरुवारी दिला गेला. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अंकुश राठोड म्हणाले की शासनाकडून १,१०६ डोस प्राप्त झाले असून त्याची यादी सुद्धा आलेली आहे. ज्या लोकांची नावे यात समाविष्ट असेल त्यांनाच लस देण्यात आली. तसे त्या सर्वांना दूरध्वनीद्वारे कळविले होते. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असेही ते म्हणाले.