दारू दुकानासाठी अनेकांच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:13+5:302021-07-24T04:18:13+5:30

नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आल्यानंतर नागभीड येथे दारू दुकान सुरू करण्यासाठी अनेकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यात ...

Many movements for a liquor store | दारू दुकानासाठी अनेकांच्या हालचाली

दारू दुकानासाठी अनेकांच्या हालचाली

Next

नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आल्यानंतर नागभीड येथे दारू दुकान सुरू करण्यासाठी अनेकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यात किती लोकांना यश येते हे काळच सांगेल.

नागभीड हे स्थान नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्हा स्थळांसोबतच अन्य जिल्ह्यांनाही मध्यवर्ती आहे. शिवाय नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन असल्याने आणि नागपूर-आरमोरी हा राष्ट्रीय महामार्ग नागभीड येथूनच गेला असल्याने प्रवासी आणि वाहनांची मोठी वर्दळ नेहमीच येथे पाहायला मिळते. त्यामुळे नागभीड येथे दारूचा मोठा ग्राहक वर्ग मिळू शकते, हे हेरून या ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी आपले दारूचे दुकान सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नागभीड शहरात आणि दोन-तीन किलोमीटरच्या परिघात आधीच देशी दारूची दोन तर विदेशी दारूची ६ दुकाने आहेत. या पार्श्वभूमीवर नागभीड येथे नागभीड-कान्पा, नागभीड-ब्रह्मपुरी, नागभीड-तळोधी या मार्गांवर विदेशी दारू दुकानांसाठी बराच वाव असल्याने या दृष्टीने अनेकांनी या मार्गांवर अनेकांनी दारूच्या दुकानांसाठी जागेचा शोध घेणे सुरू केले आहे. काही मंडळी शहरातच राष्ट्रीय महामार्गाला लागून एखादी तयार इमारत मिळते का, याचाही तपास करीत आहेत.

एका दुकानाला स्थानिकांचा विरोध

नागभीड येथे नागभीड-ब्रह्मपुरी या राष्ट्रीय महामार्गाला लागून ब्रह्मपुरीच्या दिशेने एकाने देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती आहे. याची कुणकुण स्थानिकांना लागताच यातील काहींनी या दुकानाला विरोध केला आहे. याबाबत या ठिकाणी दुकान नको म्हणून महिलांच्या सह्यांची मोहीमही राबविण्यात आल्याचे समजते.

मोठ्या गावांवरही डोळा

या दारू व्यावसायिकांचे नागभीड व नागभीडला जोडणाऱ्या महामार्गावर लक्ष आहेच, पण त्याचबरोबर तालुक्यातील मोठ्या गावांवरही डोळा आहे. यासाठी कोणते गाव योग्य राहील, याचाही अभ्यास या व्यावसायिकांकडून सुरू आहे. काहींनी तर तेथील गावपुढाऱ्यांशी संपर्कसुद्धा सुरू केला असल्याचे समजते.

Web Title: Many movements for a liquor store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.