मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चा आज धडकणार
By admin | Published: October 19, 2016 12:57 AM2016-10-19T00:57:51+5:302016-10-19T00:57:51+5:30
कधी नव्हे पहिल्यांचा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी एकत्र आला आहे.
आरक्षण मिळालेच पाहिजे : मोर्चादरम्यान शहरात सर्व प्रकारची वाहतूक बंद
चंद्रपूर : कधी नव्हे पहिल्यांचा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी एकत्र आला आहे. सर्व मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवऊन मराठा-कुणबी क्रांतीची धडक चंद्रपूर येथे १९ आॅक्टोबरला बसणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सकल-मराठा कुणबी समाज समन्वय समितीने केली असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची दमछाक होणार आहे.
कोपर्डी येथील बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देण्यात यावी, अॅट्रासिटी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाज एकवटला आहे. त्याचे प्रतिबिंब चंद्रपूर जिल्ह्यातही पडले आहे. गेल्या १५ दिवसांपासून मोर्चाची जय्यत तयार करण्यात येत आहे. त्याकरिता मराठा समाजातील परंपरागत राजकीय नेतृत्त्व पडद्यामागे राहून तरुणांनी पुढाकार घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात तयारीसाठी बैठकी घेण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात बरोबर मांडली नाही, ही सल मराठा तरूणांच्या मनात आहे. त्याच वेळी अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर वाढून अन्याय करण्यात येत असल्याची भावनाही निर्माण झाली आहे. या दोन्ही कारणांना ठोस उत्तर देण्यासाठी मराठा व कुणबी समाज एकत्र आला आहे. मोर्चाकरिता इतर समाजाचीही मदत घेतली जात आहे. त्यांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चात किती लोकं सहभागी होणार, याबाबत पोलीस अंदाज बांधत आहेत. त्यानुसार, पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोर्चेकऱ्यांच्या संख्येवरून चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी पोलिसांनी मूक मोर्चा जाणार असलेल्या सर्व ठिकाणांची पहाणी केली. सर्व चौकात बाँबशोधक पथकाकडून सायंकाळी तपासणी करण्यात आली. चौकाचौकात पोलिसांचे पथक सायंकाळपासून तैनात करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून शहरात लावण्यात आलेले विविध फलक, तोरणे दुपारी काढण्यात आली. (प्रतिनिधी)
शाळा-महाविद्यालयांबाबत संभ्रम
मोर्चात लाखो लोकांचा सहभाग राहणार, असा अंदाज लक्षात घेऊन चंद्रपूर पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. बुधवारी सकाळी ६ वाजतापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून नागरिकांना ‘नो-व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आॅटो, ट्रॅव्हल्स व जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयाची वाहने कशी पोहोचणार, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. प्रशासकीय कारणांमुळे शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकले नाही. मात्र, मोर्चाच्या आयोजकांनी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चाची सहावी आढावा बैठक
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आयोजक डोळ्यात तेल घालून नियोजन करीत आहेत. मोर्चाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी सहावी आढावा बैठक तुकूम येथील मातोश्री सभागृहात घेण्यात आली. यावेळी अंतिम टप्प्याची माहिती देण्यात आली. म्हाडा कॉलनी मैदानावर महिला, पुरुष, स्वयंसेवक आणि विद्याथी-विद्यार्थिनींच्या बसण्याची व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मोर्चा शिस्तबद्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. मोर्चात सहभागी होणाऱ्यांना स्वत:च्या जेवनाचा डबा व पाण्याची व्यवस्था करण्याबाबत आयोजकांनी कळविले आहे.
मोर्चाचा मार्ग असा राहणार
मोर्चा म्हाडा कॉलनी, इरई नदी, विदर्भ हाऊसिंग चौक, संत केवलराम चौक, दवा बाजार, जटपुरा गेट, छोटा बाजार, जयंत टॉकीज, डॉ. आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, गिरनार चौक, स्टेट बॅक चौक, मौलाना आझाद चौक, ज्युबिली शाळा, बेंगळूर बेकरी ते जटपुरा गेट या मार्गाने जाणार आहे. पुढे जिल्हा परिषद, प्रियदर्शी चौकातून चांदा क्लब ग्राऊंडवर मोर्चाचे रूपांतर सभेत होईल.
राजकीय नेते राहतील मोर्चाच्या मागे
या मोर्चाचे नियोजन करताना विद्यार्थिनी, युवती, महिलांना पुढे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थी, युवक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, इतर पुरुष यांना सहभागी केले जाईल. या सर्वांच्या शेवटी राजकीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत.