चित्रपट पडद्यावर सध्या मराठी मनाला भावणारे वातावरण
By Admin | Published: January 7, 2016 01:38 AM2016-01-07T01:38:54+5:302016-01-07T01:38:54+5:30
नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘नटसम्राट’ या दमदार नाट्यकृतीवर त्याच नावाचा चित्रपट. त्यात नाना पाटेकर यांची ...
मराठी रसिक सुखावला : ‘नटसम्राट’ व ‘बाजीराव मस्तानी’ ला प्रेक्षकांची गर्दी
वसंत खेडेकर बल्लारपूर
नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘नटसम्राट’ या दमदार नाट्यकृतीवर त्याच नावाचा चित्रपट. त्यात नाना पाटेकर यांची भूमिका, तर त्याच वेळेला ‘बाजीराव पेशवे’ यांची शौर्यगाथा आणि त्यांचे रुपसुंदरी मस्तानी सोबतचे नाजुक प्रेमसंबंध या कथानकावरील मराठमोळ्या वातावरणाचा बाजीराव मस्तानी हा भव्यदिव्य व देखणा हिंदी चित्रपट ! या दोनही चित्रपटांना मिळत असलेला मराठी हिंदी आणि अन्य भाषिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि या चित्रपटांची होत असलेली चर्चा, यामुळे सध्या मराठी व हिंदी चित्रपट पडद्यावर मराठी मनाला भावणारे वातावरण आहे.
मराठी पडद्यावर यावर्षी एकाहून एक सरस कथानक, देखणेपणा, गीत-संगीत आणि जीवंत अभिनयाने रंगलेली देखणी चित्रपटं एकामागून एक येत आहेत.
मराठी चित्रपट रसिकांना ते आनंद देत आहेत. ‘कोर्ट’ हा चित्रपट तर भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून आॅस्कर स्पर्धेत वारी करून आला. अशातच ‘बाजीराव मस्तानी’ या भव्यदिव्य चित्रपटातील मराठी बाज असलेले ‘पिंगा’ हे गीत नृत्य टीव्हीच्या पडद्यावर आले आणि पिंगा बाबत वाद प्रतिवादाने वातावरण ढवळून निघाले. पिंगा म्हणजे नेमके काय, बाजीराव आणि मस्तानी यांचे प्रेमसंबंध, खरा इतिहास आणि कादंबरीतून रेखाटलेला इतिहास या साऱ्यांवर चर्चा रंगू लागल्या. मासिक व नियतकालिकांचे रकानेच्या रकाने त्याने भरू लागले आणि लोकही ते आवडीने वाचू लागले.
त्यातून बाजीराव आणि मस्तानी यांच्याबाबतचा इतिहास लोकांना कळला. पिंगा गीत योग्य जागेतच बसविले आहे. ते पडद्यावर प्रत्यक्ष बघण्यापूर्वीच त्यावर वाद घालणे व्यर्थ आहे, चित्रपट बघा आणि योग्य की अयोग्य ते ठरवा, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते संजय लिला भंसाळी म्हणू लागले. तरीही विरोध शमता शमेना !
बाजीराव मस्तानी प्रदर्शित झाला. भंसाळी यांनी म्हटल्याप्रमाणे पिंगा योग्य ठिकाणीच बसविला गेला आहे, हे दिसून आल्यानंतर यावरील उठलेला वाद शमला आहे. आजवर हिंदीत, मुस्लीम, राजस्थानी वा इतर प्रांतातील ऐतिहासिक पुरुषांच्या कर्तृत्वावर, त्यांचे प्रेम संबंध इत्यादींवर मोठ्या बजेटची चित्रपट निघाली आहेत.
प्रदर्शनापूर्वी त्या चित्रपटांची चर्चा व्हायची व ते चित्रपटं चालायचीही. प्रभात फिल्म कंपनी आणि व्ही. शांताराम यांच्यानंतर तसे वातावरण मराठीतील कर्तृत्ववान ऐतिहासिक पुरुषांच्या बाबत हिंदी चित्रपटसृष्टीत बघायला मिळाले नाही. मराठा साम्राज्यातील कर्तृत्ववान पुरुषाच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या चर्चित प्रेम प्रकरणावर बाजीराव मस्तानी हा पहिलाच मोठ्या बजेटचा आणि सर्वत्र चर्चित तसेच, प्रदर्शनापूर्वी उत्सुकता निर्माण करणारा चित्रपट असावा.
या चित्रपटात अस्सल मराठमोठे वातावरण आहे. बाजीरावाचे शौर्य आहे. मराठी मनाला भुरळ पाडणारा पुण्याचा ऐतिहासिक शनिवार वाडा, त्यात व त्याचे अवतीभवतीचे घडलेले चांगले वाईट प्रसंग आणि हे सारे भव्यदिव्यपणे चित्रीत झाले आहे. भव्यता एवढी, युद्धप्रसंग एवढे जीवंत की डोळ्यांचे पारणे फिटावे. पिंगाची झालेली चर्चा आणि या चित्रपटाची भव्यता, मनाला भावणारे प्रसंग यामुळे मराठी मनांसोबतच हिंदी व इतर भाषिकांनाही बाजीराव मस्तानी भावत आहे.
चंद्रपुरात हा चित्रपट दोन चित्रपटगृहात सुरू आहे. या चित्रपटाचा हा तिसऱ्या आठवडा असून प्रेक्षकांची अजूनही गर्दी दिसून येत आहे. यावरून या चित्रपटाची लोकप्रियता आढळते. त्यात नाना पाटेकर अभिनीत ‘नटसम्राट’ हा याच आठवड्यात रुजू झाला आहे.
एकूण, चित्रपट पडद्यावर सध्या मराठी मनाला भावणारे व मोहरून टाकणारे वातावरण आहे.