मराठी भाषा नोकरीची, व्यवहाराची झाली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:39 PM2019-02-17T22:39:23+5:302019-02-17T22:39:54+5:30
अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे. या राज्यात अजूनही मराठी शिक्षणाचा कायदा नाही. स्वभाषा नाही तर विचार नाही, विचार नाही तर अभिव्यक्ती नाही. पोकळ, दिखाऊंच्या संस्कृतीने मेंदूवर आक्रमण केले आहे. तंत्रज्ञानाची साधने प्रगत असतांना जग विकृत होत आहे. वारकऱ्यांनी, वंचितांनीच मराठी जगविली. आपणच मराठीचे मारेकरी आहोत. स्वत:च्या स्वभाषेचे रक्षण दुसऱ्याचे गळे कापून होणार नाही. मराठी समाज एकसंघ, सजग जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपली भाषा नोकरीची, व्यवहाराची व संधीची होणार नाही, असे मार्मिक विवेचन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे तर उपस्थितीत नागपूरचे कवी वसंत वाहोकार, उपप्राचार्य डॉ. धनंजय गहाणे, मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकर, डॉ. प्रकाश वट्टी उपस्थित होते. याप्रसंगी वाहोकरांनी आता काळ तुमचा आहे, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा आहे. सर्वांनी व्यक्त आपल्या स्वभाषेत व्हा, असा सल्ला दिला. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाच्या एम ए मराठी परीक्षेत मेरीट विद्यार्थी शितल भानारकर व मनीषा बावणकर यांना गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कोकोडे म्हणाले, खरं आहे अनेक देश आपल्या स्वभाषेतच तंत्रज्ञान, विज्ञानाचे शोध मांडत आहेत. मेंदूचे भरणपोषण करण्याचे काम साहित्यच करीत असते. भाषा, संस्कृतीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
प्रास्ताविक डॉ. धनराज खानोरकर तर संचालन डॉ. प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर वानखडे यांनी मानले.