शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागभिडात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:22+5:30
हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा यांनी संबोधित केले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी केले.
या मोर्चाची सुरूवात तालुका भाजपाच्या कार्यालयातून करण्यात आली. हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष हरिश शर्मा यांनी संबोधित केले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यानंतर तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी मोर्चाला सामोरे येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या मोर्चात प्रामुख्याने वसंत वारजूकर, मोरेश्वर ठिकरे, न.प.चे अध्यक्ष प्रा.डॉ.उमाजी हिरे, कृउबासचे सभापती आवेश पठाण, न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृउबासचे उपसभापती रमेश बोरकर, न.प.सभापती सचिन आकूलवार, पं.स.सदस्य संतोष रडके, जि.प.चे माजी सभापती ईश्वर मेश्राम, माजी सभापती डॉ.मदन अवघडे आदी सहभागी झाले होते.
या आहेत मागण्या
सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, श्रावणबाळ योजनेची वयोमर्यादा ६० वर्ष करण्यात यावी, अतिवृष्टीची २५ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसानभरपाई देण्यात यावी, घरगुती व कृषिपंपांचे वीज बील माफ करण्यात यावे, नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा, अतिक्रमणधारकांना शेतीचे पट्टे देण्यात यावे, वर्ग २ मध्ये असलेल्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात याव्या, गोसेखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कृउबासमध्ये धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्यात यावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी आदी विविध मागण्या शेतकºयांकडून यावेळी करण्यात आल्या.
राममंदिर चौकात घोषणा
राम मंदिर चौक नागभीडचा प्रमुख चौक आहे. या चौकात मोर्चा आल्यानंतर येथे मोर्चा थांबविण्यात आला व विविध घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर चांगलाच दणाणून गेला. दिवसभर या मोर्चाचीच चर्चा होती.
सत्तेत येण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना जी वचने दिली, ती पूर्ण केल्याशिवाय, अतिवृष्टीची प्रति हेक्टर २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय आणि जे शेतकरी नियमित कर्जाचा भरणा करीत आहेत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
- कीर्तीकुमार भांगडिया
आमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र.