झेंडू वनस्पतीचा मत्स्यपालनात अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:31+5:302021-09-18T04:30:31+5:30
विनायक येसेकर भद्रावती : तालुक्यातील नागपूर - चंद्रपूर राज्य महामार्गालगत घोडपेठ गावातील तलावात झेंडू नामक वनस्पती पसरल्याने भद्रावती येथील ...
विनायक येसेकर
भद्रावती : तालुक्यातील नागपूर - चंद्रपूर राज्य महामार्गालगत घोडपेठ गावातील तलावात झेंडू नामक वनस्पती पसरल्याने भद्रावती येथील मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्थेला गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आर्थिक फटका बसला आहे. संस्था कमिटीच्या नियोजनाअभावी ही वनस्पती दिवसेंदिवस वाढत आहे. या संस्थेत सुमारे ५००हून अधिक मच्छीमार सभासद असून, त्याच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मालकीचा व पंचायत समिती कार्यक्षेत्रातील अंदाजे ८० एकरचा तलाव शेतीच्या सिंचनाशिवाय मत्स्य संगोपन व मासेमारीसाठी मच्छीमार संस्थेला लीजवर प्राधान्याने देण्यात येतो. सन १९५१मध्ये मच्छीमार व भोई समाजातील मच्छीमारांचे जीवनमान व आर्थिक स्तर कसा सुधारेल, असा उदात्त हेतू ठेवून दिवंगत माजी खासदार जतीरामजी बर्वे यांच्या प्रेरणेतून भोई व ढिवर समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन प्रथम अध्यक्ष स्वर्गीय सदाशिव कामतवार व संचालक कमिटी सदस्यांनी संस्थेची स्थापना केली. हे तलाव चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाच्या शिफारसीनुसार जिल्हा परिषदेकडून संस्थेच्या सभासदाच्या उपजीविकेच्या माध्यमातून मस्त संगोपनासाठी लीजवर घेण्यात येत आहे. गेल्या ७० वर्षांपासून हा तलाव संस्थेच्या ताब्यात आहे. पाचशेच्या वर सभासदांच्या कुटुंबांचा गाडा या तलावाच्या मासेमारीमुळे चालतो.
मासेमारीव्यतिरिक्त शिंगाडा शेतीच्या लागवडीसाठी अतिरिक्त लीजदेखील संस्थेला मोजावी लागत होती. मात्र, कालांतराने सन १९९९ - २०२०मध्ये या तलावात झेंडू नामक वनस्पतीने शिरकाव केला. ज्यामुळे शिंगाडा शेती करणे अशक्य झाले. तलावात दरवर्षी लाखो रुपयांचे मत्स्यबीज संगोपनासाठी सोडले जातात. त्यातून लाखोंचे उत्पादन होत असते. मात्र, झेंडूसारखी नुकसानकारक वनस्पती पाण्यावर तरंगून संपूर्ण तलावावर पसरल्यामुळे जाळे टाकून मासे पकडणे कठीण झाले आहे. या वनस्पतीमुळे पुरेसा प्राणवायू मिळत नसल्याने मासे मृत्युमुखी पडत आहेत.
कोट
घोडपेठ तलावात झेंडूसारखी वनस्पती पसरल्याने मासे सतत मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच शिंगाडाचे उत्पादन ठप्प झाल्याने संस्थेला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
-दिलीप मांढरे, माजी अध्यक्ष, मच्छिमार संघटना.
170921\img-20210917-wa0061.jpg
घोडपेठ तलावातील झेंडू वनस्पतीमुळे मच्छीमार संस्थेला आर्थिक नुकसान .