बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:44 PM2017-12-16T23:44:18+5:302017-12-16T23:45:47+5:30
आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे.
राजेश मडावी।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे. शनिवारपर्यंत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन लाख पाच हजार ७६ क्विंटल कापूस, तर नागभीड समितीमध्ये ४८ हजार ८५२ क्विंटल धान खरेदी झाली. शेतमालास जादा भाव मिळेल, या हेतूने काही शेतकऱ्यांनी शेतमाल साठवून ठेवला. पण, ही संख्या कमीच आहे. सोयाबीन, कापूस आणि धानाला समाधानकारक भाव मिळत नसला, लोकांची देणी फे डून कर्जाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर आता पर्यायच उरला नाही.
नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, मूल तालुक्यांमध्ये या हंगामात धानाची सर्वाधिक लागवड करण्यात आली. यंदा पावसाने सुरुवातीलाच दगा दिला त्यामुळे रोवणीची वेळ निघून गेली. सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकºयांनी पावसाची प्रतिक्षा करून हैराण झाले होते. हंगाम टळेल, या भितीने अनेक शेतकºयांनी कशीबशी रोवणी उरकविली. पावसाचा अभाव आणि विविध किडींनी धान पिकावर हल्ला केल्याने एकरी उत्पादकता घटली. त्याचा जोरदार फटका यंदा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च आणि वर्षभरातील कुटुंबाचा ताळमेळ कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला. शासनाने शेतमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. पण, त्यातही कटकटी वाढवून ठेवल्या. या वर्षी पाऊस उशीरा आल्यामुळे शेतमाल बाजारात निराशा पसरली होती. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये खरेदीला सुरुवात झाली नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान उत्पादक तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चूरणे केल्याने आता धान्य विक्रीला वेग आल्याचे दिसून येत आहे. पोंभूर्णा तालुक्यामध्ये ५४ हजार ११५ क्विंटल धान खरेदी झाली. गेल्या वर्षी खरेदीने उच्चांक गाठला होता. ब्रह्मपुरीत २०० क्विंटल धान्याची आवक झाली असून, मूल बाजार समितीमध्ये शनिवारपर्यंत ४० हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. सिंदेवाही बाजार समितीमध्ये केवळ एक हजार क्विंटल धान्य खरेदी केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.
शेतमाल हमीभाव खरेदी केंद्रांकडे पाठ
शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, यासाठी शासनाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू केले. यंदा पहिल्यांदाच आॅनलाईन नोंदणीची सक्ती केली. शेतमाल विक्रीकरिता सात व अन्य कागदपत्रांच्या अट लागू केल्याने शेतकरी दुरावले. परिणामी, शेतमाल खरेदी केंद्राला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नोंदणी करणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या अल्प आहे.
लूट होण्याचा धोका
रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण, खरीप हंगामात अल्प उत्पादन झाले. त्यातून लागवडीचा खर्चही हाती येणार की नाही, या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकल्यानंतर लगेच चुकारे मिळतात, या आशेने शेतकरी शेतमाल विकत आहेत. मात्र, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापारी व बाजार समित्यांवर चौकशी समित्या पाठवून संभाव्य लुटेला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक खरेदी
कोरपना बाजार उत्पन्न समितीमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. नाफेडतर्फे २९५ क्विंटल खरेदी झाली असून, २ हजार ५०० ते ३ हजार ६२ रुपये प्रती क्विंटल भाव सोयाबिनला दिला जात आहे. व्यापाऱ्यांकडून रोख रक्कम मिळत असल्याने बरेच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.