बाजार समित्यांमध्ये आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:49 PM2018-01-07T23:49:16+5:302018-01-07T23:50:46+5:30
मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पादक तालुके म्हणून ओळखले जाते. यावर्षी या तालुक्यांमध्ये समाधानकारक पिक होईल, ....
राजू गेडाम ।
आॅनलाईन लोकमत
मूल : मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पादक तालुके म्हणून ओळखले जाते. यावर्षी या तालुक्यांमध्ये समाधानकारक पिक होईल, अशी आशा असतानाच मावा, तुडतुडा रोगांनी आक्रमण केल्याने धानाचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरही झाला आहे. यंदा या समित्यांमध्ये धानाला मागील वर्षीपेक्षा चांगला भाव असला तरी समित्यांमध्ये आवक घटली आहे. यामुळे बाजार समित्यांच्या सेसही कमी होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे सन २०१६-१७ सन २०१७-२०१८ या वर्षातील एप्रिल ते डिसेंबर महिन्याकडे नजर टाकली तर डिसेंबर १७ पर्यंत जुनाच धान बाजार समितीत आल्याचे दिसून येते. जानेवारी २०१८ मधील आकडेवर नजर टाकली तर मागील वर्षीच्या तुलनेत धानाची आवक कमी असल्याचे दिसून येते. २०१६-१७ या वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत तीन लाख ३८ हजार ६६८ क्विंटल धान बाजार समितीत आले असून त्याची किंमत ७३ कोटी ६७ लाख २३ हजार ६३२ रुपये आहे. तर सन २०१७-१८ या वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत तीन लाख ८५ हजार ४२२ क्विंटल धान आला असून त्याची किंमत ९३ कोटी ८ लाख ८ हजार १५६ रुपये आहे. यात ८९ हजार ५४४ क्विंटल धानाची आवक वाढली आहे. मात्र हा धान जुनाच आणला जात असल्याची माहिती समितीतील अधिकाऱ्यांनी दिली. डिसेंबर, जानेवारी महिन्यात नवीन धान निघतो. मात्र आता जानेवारीमध्ये धानाची आवक कमी झाली आहे. ५ जानेवारी २०१७ ला बाजार समितीत सहा हजार ९२८ पोते तर जानेवारी १८ मध्ये केवळ चार हजार ७७३ पोते आल्याचे दिसून येते. यावरुन दोन हजार १५५ पोत्यांची घट दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही घट दिसून येणार आहे. कारण उत्पादनात घट झाल्याने बाजार समितीत येणारा धानाचा पुरवठा कमी होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळणारा सेससुद्धा कमी होईल. त्याचा थेट परिणाम बाजार समितीच्या कामकाजावर होईल, असे दिसून येते. विशेष म्हणजे, संपूर्ण धान उत्पादक तालुक्यांमध्ये हीच स्थिती आहे.
यावर्षी धानाला भाव समाधानकारक आहे. मात्र हातात धानच नसल्याने शेतकºयांना याचा फायदा होणार नसल्याचे दिसते.
यावर्षी शेतकºयांनी काही भागात पाण्याअभावी धानाची पेरणी केली नाही. काहींनी केली तर ऐन हंगामात मावा, तुडतुडा या रोगांनी त्यांचे धान फस्त केले. त्यामुळे शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. आता शासनाने आणेवारीचा अंतिम अहवाल तयार करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाने आतातरी आणेवारी जाहीर करताना शेतकºयांवर अन्याय होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशीही मागणी केली जात आहे.
यावर्षी शेतकºयांच्या पिकांना मावा, तुडतुडा रोगांनी खाऊन टाकले. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर आहेत. शासनाने अंतिम आणेवारी जाहीर करुन धान उत्पादक तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणे गरजेचे आहे. शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळाल्यास खूपच आधार मिळेल. बाजार समितीत जानेवारी १८ मध्ये येणारी धानाची आवक बघता बाजार समितीच्या उत्पादनातही घट येईल.
- घनश्याम येनूरकर , सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल