बाजार वसुली पावती योग्य की अयोग्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:32 AM2021-09-15T04:32:41+5:302021-09-15T04:32:41+5:30
ब्रह्मपुरी : नगर परिषदेकडून फुटपाथवर दुकाने लावणाऱ्या दुकानदारांकडून वसुली करण्यात येत आहे. सध्या हे कंत्राट कुणालाही देण्यात आले नसल्याची ...
ब्रह्मपुरी : नगर परिषदेकडून फुटपाथवर दुकाने लावणाऱ्या दुकानदारांकडून वसुली करण्यात येत आहे. सध्या हे कंत्राट कुणालाही देण्यात आले नसल्याची माहिती आहे. न. प. कडून ही वसुली सुरू आहे. मात्र, देण्यात येणाऱ्या पावतीवर सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्का नसल्याने करण्यात येणारी वसुली योग्य की अयोग्य, असा प्रश्न फुटकळ व्यावसायिक करीत आहेत.
नगर परिषद हद्दीतील फुटकळ व्यावसायिकांकडून दैनिक शुल्क वसुली करण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. त्याकरिता निविदा प्रकाशित करून कंत्राट देण्यात येतो. न. प. कडून आर्थिक वर्ष २०२१ चे आठ महिने लोटूनही निविदा प्रकाशित करण्यात आली नाही. याबाबतचा कंत्राटही देण्यात आलेला नाही. त्यामुळे न. प. चा कर्मचारी ही वसुली करतो. पूर्वी बाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात भरत होता. हा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हलविण्यात आला आहे. त्यानंतर बाजारातील वसुलीचा अधिकार बाजार समितीकडे अखत्यारीत आहे.
न. प. च्या हद्दीतील फूटपाथवर हाथठेले घेऊन व्यवसाय करणाऱ्यांकडून दैनिक वसुली फार थोड्या प्रमाणात आहे. हा कंत्राट लहान स्वरूपाचा असल्याने तो घेण्यास कुणीही तयारी दर्शवित नाही. त्यामुळेच हा कंत्राट काढण्यात न आल्याची माहिती आहे. नगर परिषदेचा कर्मचारी ही दैनिक शुल्क वसुली करीत असून वर्षाला १ ते १.५० लक्ष एवढी वसुली गोळा होते. परंतु नियमानुसार वसुली करण्यात येत असली तरी देण्यात येणाऱ्या वसुली पावतीवर सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्का नसल्याने ही वसुली रीतसर आहे काय, देण्यात येणारी वसुली पावती योग्य की अयोग्य, असा प्रश्न विचारला जात आहे.
कोट
नियमानुसार फुटकळ व्यावसायिकांकडून दैनिक वसुली करण्यात येत आहे. देण्यात येणाऱ्या पावतीवर सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे.
- मनोज वठे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ४, नगर परिषद, ब्रह्मपुरी,
140921\img_20210913_135209.jpg
स्वाक्षरी व शिक्का नसलेली न. प. कडून देण्यात आलेली पावती