पणन महासंघ खरेदी करणार दररोज ८५ हजार क्विंटल कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 09:43 PM2020-09-26T21:43:11+5:302020-09-26T21:46:09+5:30
या हंगामातही सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदीची तयारी सुरू केली. ग्रेडरची कमतरता असल्याने या हंगामात ३० केंद्र तसेच ६० ते६५ जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी होवू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गतवर्षीच्या हंगामात कापूस खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, या हंगामातही ३० केंद्राच्याच माध्यमातून दररोज ८५ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने याबाबत अद्याप नियोजन जाहीर केले नाही.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने मागील हंगामात ९२ केंद्र तसेच १९२ जिनिंगच्या माध्यमातून ९५ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली होती. यावर्षी सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ८२५ जाहीर केला आहे. त्यामुळे या हंगामातही सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदीची तयारी सुरू केली. ग्रेडरची कमतरता असल्याने या हंगामात ३० केंद्र तसेच ६० ते६५ जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी होवू शकते. दररोज सरासरी ७५ हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करून ३० केंद्रांच्या माध्यमातून १५ हजार गाठी तयार केल्या जावू शकतात, अशी माहिती सूत्राने दिली.
राज्यातील कपाशीचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर
राज्यातील कपाशीचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर आहे. कपाशीचा दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक पेरा असलेले १४० तालुके आहेत. सद्यस्थितीत बाजारातील कापसाचे दर ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० प्रति क्विंटल आहे. सरकारने २०२०-२१ करिता कापसाचा हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार ८२५ जाहीर केला आहे.
ऑक्टोबरअखेर खरेदीची शक्यता
यंदाच्या हंगामातील कापूस खरेदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला सुरू होण्याची शक्यता आहे. मेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जावू शकतो. सध्या ३० केंद्रांचाच प्रस्ताव आहे. मात्र पायाभूत सुविधा निर्माण केल्यास केंद्रांची संख्या वाढू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत काय निर्णय होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.