कापूस खरेदीसाठी पणन महासंघ राज्यभरातील केंद्रांवर उभारणार शेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 02:43 PM2020-06-19T14:43:30+5:302020-06-19T14:45:40+5:30
कापूस खरेदी बंद होऊ नये म्हणून कापूस ठेवण्याकरिता राज्यभरातील कापूस केंद्रावर बाजार समितीकडून तात्पुरते शेड उभारले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हमी भावाने पणन महासंघाने कापसाची खरेदी सुरू केली. सध्या शेतकऱ्यांच्या घरातच कापूस आहे. जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यास पुरेसे शेड नसल्याने पावसाळ्यात कापूस खरेदी करून कसा ठेवावा, असा प्रश्न उपस्थित झाल्याने खरेदी बंद झाली. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले. आता कापूस खरेदी बंद होऊ नये म्हणून कापूस ठेवण्याकरिता राज्यभरातील कापूस केंद्रावर बाजार समितीकडून तात्पुरते शेड उभारले जाणार आहे.
वरोरा परिसरात कापसाचे उत्पादन निघताच बाजार भाव कोसळले. त्यामुळे कापसाला हमी भाव मिळावा, याकरिता हजारो शेतकऱ्यांना कापूस उत्पादक पणन महासंघाकडे नोंदणी केली. हमी भावाची कापूस खरेदी संथगतीने सुरू होती. पणन महासंघाकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यातच टाळेबंदीमध्ये अनेक दिवस कापूस खरेदी बंद होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता असलेल्या उपाययोजना करून हमी भावाने कापूस खरेदी सुरू करण्यात आली. त्यानंतर अकाली पाऊस पडल्याने खरेदी केलेला कापूस व गाठी भिजल्या. यात पणन महासंघाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर कापूस खरेदी काही दिवसांकरिता बंद करण्यात आली.
कापूस खरेदी केल्यानंतर शेड असलेले गोदाम कापूस व गाठीने हाऊसफुल्ल झाले. त्यानंतर अनेक कापूस केंद्रावर खरेदी सुरू झाली. परंतू ग्रेडरची कमतरता असल्याने केंद्र मिळूनही कापूस खरेदी संथगतीने सुरू होती. यावर प्रशासनाने पर्याय शोधत कृषी विस्तार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देवून ग्रेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. पण शेतकऱ्यांच्या घरात कापूस गोदामे फुल्ल व पाऊस सुरू झाला. त्यामुळे हमी भावाने कापूस खरेदीवर चिंतेचे सावट पसरले. यावर पर्याय म्हणून बाजार समित्यांच्या वतीने कापूस खरेदी केंद्रावर लाखो रुपये खर्च करून तात्पुरते शेड उभारून हमी भावाने खरेदी झालेला कापूस ठेवल्या जाणार आहे. यामुळे हमी भावाने कापूस विक्रीकरिता प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हमी भावाने कापूस विक्रीकरिता हजारो शेतकरी नोंदणी करून प्रतीक्षेत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने कापूस ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला. परंतु शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कापूस ठेवण्याकरिता तात्पुरते शेड उभारले जाणार आहे.
- राजेंद्र चिकटे, सभापती
कृषी बाजार समिती, वरोरा