जिल्ह्यातील बाजारपेठा लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:36+5:30
चंद्रपुरात सात दिवस सर्वच ठप्प राहणार असल्याने नागरिकांनी गुरुवारी जीवनावश्यक व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली होती. जणू एखादा सण वा उत्सव असावा, असा भास नागरिकांची गर्दी पाहून वाटत होता. विशेष म्हणजे ही गर्दी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत कायम होती.मात्र शुक्रवारी चंद्रपुरातील रस्ते सकाळपासून शांत दिसत होते. दिवसभर बाजारपेठा बंद होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शुक्रवारपासून सात दिवस संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. याला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनीही या कर्फ्यूत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजारपेठा लॉकडाऊन दिसून आल्या. काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर निघाल्याचे दिसले. मात्र अनेक शहरात आज शांतताच दिसून आली.
चंद्रपुरात सात दिवस सर्वच ठप्प राहणार असल्याने नागरिकांनी गुरुवारी जीवनावश्यक व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली होती. जणू एखादा सण वा उत्सव असावा, असा भास नागरिकांची गर्दी पाहून वाटत होता. विशेष म्हणजे ही गर्दी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत कायम होती.मात्र शुक्रवारी चंद्रपुरातील रस्ते सकाळपासून शांत दिसत होते. दिवसभर बाजारपेठा बंद होत्या. भाजी मार्केट, किराणा दुकानही बंद असल्याने नागरिकांना बाहेर निघण्याची गरजच भासली नाही. महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, गोलबाजार, गांधी चौक, गंजवार्ड, बंगाली कॅम्प, बागला चौक या ठिकाणी दिवसभर शांतता दिसून आली. मात्र वार्डावार्डातील चौकात नागरिकांनी गप्पांचा फड रंगविल्याचे दिसून आले. काही ठिकाणी नागरिक दुकानांच्या पायºयावर बसून असल्याचे दिसले.
बाजारपेठा बंद, नागरिक मात्र रस्त्यावर
सावली : कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सावली येथील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या जनता कर्फ्यूला साथ दिली. सात दिवस येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहिल्या दिवशीच सर्व दुकाने बंद होती. मात्र नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. ग्रामीण भागात या विषाणूने शिरकाव केल्याने संक्रमण वाढत आहे. बाधितांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही धोकादायक आहे. त्यामुळे सावली तालुका प्रशासनाने सात दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी संघटनेला केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी संघटनेने स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यात दवाखाना, मेडिकल वगळता सावली शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील संपूर्ण बाजारपेठा बंद असल्या तरी बहुतेक नागरिक विना मास्क रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले.
घुग्घुस परिसरातील व्यापारपेठ पूर्णत: बंद
जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी घुग्घुस परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेऊन प्रशासनाच्या आवाहनाचे पालन केले. मात्र इतर शासकीय,निमशासकीय कार्यालये, बॅँका सुरू असल्याने कामकाजाकरिता नागरिक बाहेर पडले. औद्योगिक क्षेत्रातील वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट कंपनी, लायडच्या कामगारांची रस्त्यावरील वर्दळ सुरू होती. मात्र आज पोलिसांची गस्त सुरू असल्याने घराबाहेर पडताना मास्कचा वापर केला जात होता.
बल्लारपुरात जनता कर्फ्यू यशस्वी
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढतच आहे. कोरोना बाधितांची संख्या बल्लारपुरात ७८० झाली असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथील व्यापाºयांनी व नागरिकांनी जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद दिला. कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाºयांची दुकाने बंद होती. किराणा, भाजीपाला, फळे बंद होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. तहसील प्रशासन, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाचे पाच पथक शहरात फिरून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तहसील प्रशासनाच्या पथकात पथक प्रमुख नायब तहसीलदार सी.जी.तेलंग, मंडळ अधिकारी अजय मेकलवार आणि सहकारी जनतेस जनता कर्फ्यू ला सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते.
गडचांदुरात कडकडीत बंद
गडचांदूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केलेल्या आवाहनानुसार पहिल्याच दिवशी गडचांदूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील संपूर्ण बाजारपेठ, शैक्षणिक संस्था बंद होत्या. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. सर्व व्यापारी बंधूनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, गडचांदुर व्यापारी असोसिएशनने १७ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यूचे आयोजन केले होते. त्यावेळीसुद्धा संपूर्ण नागरिकांनी १०० टक्के यशस्वी केला होता.
ब्रम्हपुरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्रम्हपुरी : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने जिल्ह्यात तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातसुद्धा कहर केला. कोरोना बधितांची तसेच मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळे नागतिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूला ब्रह्मपुरीकरांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हा कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ब्रह्मपुरी प्रशासनाने केले होते. शुक्रवारी शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसत होती. फक्त औषधालय, रुग्णालय सुरू होते.