मारोडा आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:38 PM2017-10-12T23:38:40+5:302017-10-12T23:39:21+5:30
स्व. मा. सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे, असे असतानाही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : स्व. मा. सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे, असे असतानाही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे.
मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे उपकेंद्रातील डॉक्टरांना येवून रुग्णसेवा करावी लागत आहे. या आरोग्य केंद्रात अस्वच्छता पसरलेली असून रुग्णांना अशुद्ध पाणी पुरवठा करीत असल्याचे बोंब प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु आहे. याबाबत बुधवारी ग्रामसभा घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
मूल तालुक्यातील मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन ते चार महिन्यांपासून नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे प्रशासकीय आणि वित्तीय कामकाज पाहण्यासाठी राजोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चरपे यांची प्रतिनियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात केली आहे. मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मारोडा, कोसंबी, चिचाळा, राजगड आणि भादुर्णी असे पाच उपकेंद्र सुरु आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. यामुळे आलेल्या रुग्णांना मूल, चंद्रपूर अथवा सिंदेवाही किंवा जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार करावा लागत आहे. स्व. मा. सा.. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासोबतच येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांशी सौजन्याने बोलत नाही. यामुळे मारोडा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधाने ग्रामपंचायतीने बुधवारी ग्रामसभेचे आयोजन केले होते. सदर ग्रामसभेत नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पेंदोर आणि डॉ. घाटे यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात आलेली आहे. मात्र काही महिन्यापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नसल्यामुळे रुग्णांना बाहेरगावी जावून उपचार करावा लागत आहे. मूल तालुक्यातील मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. या केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य पुन्हा धोक्यात येते.
रात्र पाळीत रुग्णांवर उपचार नाही
मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील काही डॉक्टर व कर्मचारी रात्र पाळीत आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नाही. त्यामुळे रात्र पाळीत उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मूल अथवा चंद्रपूरला जावून उपचार करावा लागत आहे.
कारभार वाºयावर: पप्पू पुल्लावार
मा.सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार वाºयावर सुरु आहे. आरोग्य कर्मचारी आलेल्या रुग्णांशी सौजन्याने बोलत नाही. डॉक्टरांअभावी अनेक रुग्णांना मूल, चंद्रपूर येथे जाऊन उपचार करावे लागत आहे. याबाबत अनेकदा तालुका वैद्यकीय अधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु तालुका वैद्यकीय अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रिया मारोडा ग्रामपंचायतीचे सदस्य पप्पू पुल्लावार यांनी दिली.
पर्यायी व्यवस्था केली आहे : डॉ. मेश्राम
प्राथमिक आरोग्य केंद्रातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो, त्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पाऊडर टाकण्यासाठी ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करणार आहे. आरोग्य केंद्रातील डॉ. पेंदोर आणि डॉ. घाटे हे गैरहजर आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून तीन डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली असून त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले आहे, अशी प्रतिक्रीया तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिली.