सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By admin | Published: December 11, 2015 01:32 AM2015-12-11T01:32:08+5:302015-12-11T01:32:08+5:30
तालुक्यातील गोरजा येथील १९ वर्षीय विवाहितेने लग्नाच्या सातव्या महिन्यांतच सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
पैशाचा तगादा : लग्नानंतर सात महिन्यांतच आत्महत्या
भद्रावती: तालुक्यातील गोरजा येथील १९ वर्षीय विवाहितेने लग्नाच्या सातव्या महिन्यांतच सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरुन पती, सासू व भासऱ्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
प्रिया सतीश रोडे (१९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. माहेरहून टीव्ही, गॅस शेगडी, नवीन गाडी व नवीन घर बांधण्यासाठी, पती सतीश रोडे, सासू शोभा रोडे व भासरे संदीप रोडे हे नेहमी मारहाण करुन शारिरीक व मानसीक छळ करायचे. त्यामुळे प्रिया रोडे ही त्रस्त होती. त्यांच्या जाचाला कंटाळून प्रियाने आत्महत्या केली, अशी तक्रार मृत मुलीचे वडील अरुण बापुराव ठावरी यांनी पोलिसात केली.
अरुण बापुराव ठावरी रा. विरंकूड ता. वणी जि. यवतमाळ यांची मुलगी प्रिया हिचे तालुक्यातील गोरजा येथील सतीश ऊर्फ सचिन रोडे यांच्यासोबत २६ एप्रिल २०१५ ला रितीरीवाजाप्रमाणे लग्न झाले. विवाहानंतर दोन महिने सुखी संसार थाटल्यानंतर हिला सासरच्या मंडळीकडून नेहमीच मारहाण होत होती. राखी या सणानिमित्त प्रिया ही माहेरी गेली असता तिने सासरी होणारा प्रकार सांगितला. नवीन दिवाळीसाठी प्रिया ही पुन्हा माहेरी गेली असता तिची प्रकृती खालावलेली दिसली. तिच्या डोळ्याला दुखापत होती. याबाबत वडिलांनी विचारणा केली असता पैसाचा तगादा लावत पती, सासू व भासऱ्यांनी मारहाण केल्याचे प्रियाने सांगितले. याशिवाय शेजारच्याशी बोलणे बंद केले. घरातून बाहेर निघण्यास परवानगी नव्हती, ही सर्व बाब मोबाईलद्वारे सांगण्याच्या प्रयत्न केला असता पती व सासू जवळ राहायचे, असेही तिने सांगितले. त्यामुळे सासरी जाणार नाही, असा हट्ट तिने धरला होता. मात्र, वडिलांनी प्रियाची समजूत घालून जावई सतीशमध्ये सुधारणा होईल, या हेतूने मुलीला सासरी पाठविले.
दरम्यान, काल बुधवारी तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळूनच प्रियाने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे वडील अरुण ठावरी यांनी पोलिसांत.
पोलिसांनी आरोपी सतिश रोडे (पती), शोभा रोडे (सासू) संदीप रोडे (भासरे) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर ३०६, ३०४ (ब) ४९८ (अ) ३४ भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)