मासळ बु. परिसरात राजकीय हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:21+5:302021-02-07T04:26:21+5:30
मासळ बु. : चिमूर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम तहसीलदार विजयकुमार सूर्यवंशी यांनी ...
मासळ बु. : चिमूर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम तहसीलदार विजयकुमार सूर्यवंशी यांनी जाहीर केला. त्याअनुषंगाने तालुक्यात ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत सरपंचपदाच्या निवडणूक होणार आहेत. दरम्यान सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता लागली आहे.
एकीकडे बहुमत आहे; मात्र अनेक ठिकाणी पॅनलप्रमुखांचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे बहुमत नाही. त्यामुळे मासळ बु, परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १५ जानेवारी रोजी जाहीर झाला. यामध्ये अनेक गावांत पॅनलप्रमुखांना काठावर बहुमत मिळाल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर २९ जानेवारी रोजी नव्याने काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत बरचे फेरबदल झाले आहेत. त्यामुळे काठावरचे बहुमत आणि नव्याने आरक्षणात झालेले बदल यामुळे पॅनलप्रमुखांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र सध्या मासळ परिसरात पाहायला मिळत आहे.
आपल्याच पॅनलचा सरपंच व्हावा म्हणून अनेक गावांतील नवनिर्वाचित सदस्य सहलीवर गेले आहेत. सरपंचपद आरक्षित असलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. आरक्षण प्रवर्गातील उमेदवारच सरपंचपदी विराजमान होणार असल्याने आता सरपंचपदाच्या उमेदवारांनी दुधाची तहान ताकावर भागविण्याच्या उद्देशाने उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. परिसरातील गावात विजयी पॅनलकडे आरक्षण प्रवर्गातील उमेदवार नसल्याने विरोधी पॅनलकडे सरपंचपद जात आहे. विशेष म्हणजे सरपंचपदाचे आरक्षण पाच वर्षांसाठी असल्याने त्यांना हातावर हात धरून बसण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. गावातील दिग्गजांची आता उपसरपंचपद मिळविण्याच्या धडपडी वाढल्याचे चित्र मासळ परिसरात आहे.