मास्कने लिपस्टीकची लाली घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:14+5:302021-04-29T04:21:14+5:30

चंद्रपूर शहरातील प्रत्येक कॉलनीत जवळपास १०, तर एकूण शहरात १५०० च्यावर ब्युटीपार्लर आहेत. याद्वारे महिलांना चांगला रोजगार मिळतो. बहुतांश ...

Mask removes lipstick blush! | मास्कने लिपस्टीकची लाली घालविली!

मास्कने लिपस्टीकची लाली घालविली!

Next

चंद्रपूर शहरातील प्रत्येक कॉलनीत जवळपास १०, तर एकूण शहरात १५०० च्यावर ब्युटीपार्लर आहेत. याद्वारे महिलांना चांगला रोजगार मिळतो. बहुतांश महिला स्वत:ला निटनेटक्या ठेवण्यासाठी व आकर्षक दिसण्यासाठी पार्लरमध्ये जात असतात. त्यामुळे बाजारपेठेत महिलांच्या कॉस्मेटिकला मोठी मागणी असते. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी पार्लर, मेकअप, फेशल, फाउंडेशन फेस वॉश, लिपस्टिक याच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यंदा कोरोेनामुळे विवाहसोहळे रद्द करण्यात आले आहेत. नववधूला सजविण्यासाठी पार्लर व्यावसायिकांची मोठी मागणी असते. मात्र, यंदा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

कोट

राज्य सरकारने लॉकडाऊन सुरू केल्याने सर्व दुकाने बंद आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. यापूर्वी काही दिवस दुकाने सुरू हाेती. मात्र, व्यवसाय मर्यादित हाेता. मार्च ते मे या महिन्यांत लग्नसराई राहत असल्याने चांगला व्यवसाय होत होता. मागील वर्षीसुद्धा ऐन सिझनमध्येच लॉकडाऊन झाला. आतासुद्धा ऐन कमाईच्या दिवसात व्यवसाय बंद आहे. दुकानाचे भाडे द्यायचे कसे असा प्रश्न पडत आहे. शासनाने आवश्यक ती उपाययाेजना करून मदत देण्याची गरज आहे.

-प्रतीक्षा रायपुरे , साैंदर्य प्रसाधने व्यावसायिक, चंद्रपूर

कोट

यंदा काेराेनामुळे सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. तसेच बाहेरगावी जाणेसुद्धा व घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहे. कोराेना संसर्गाच्या भीतीने आपण पार्लरमध्ये जाणे बंद केले आहे. घरी साहित्य आणून शक्य हाेईल तेवढ्या प्रमाणात नीटनेटके राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. पार्लरमधील कर्मचारी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विविध क्रिम लावणे, चेहरा स्वच्छ करणे, आदी काम करीत असतात. त्यामुळे आता पार्लरमध्ये जाण्यास भीती वाटायला लागली आहे. प्रत्येकाने स्वत:ची स्वत:च काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून पार्लरमध्ये जाणे बंद केले आहे.

मोनिका वाकोडे, गृहिणी

कोट

काेराेनापूर्वी मैत्रिणीसोबतच नेहमीच ब्युटीपार्लरमध्ये जायची. मात्र, यंदा काेराेनाच्या भीतीपाेटी पार्लरमध्ये जाणे पूर्णत: बंद आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी काही महिला पार्लरमध्ये जात आहेत. परंतु, आता सर्व कार्यक्रमच बंद असल्याने बाहेर जाण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे आता सजण्यातही मन नाही. एकीकडे जागतिक महामारी आहे. त्यातही अनेक सोशल मीडिया सुरू केल्यानंतर कुणाचे ना कुणाचे निधन झाल्याचे आढळून येते. त्यामुळे आता पार्लरमध्ये जाण्याची इच्छा होत नाही. कोरोना देशातून केव्हा नष्ट होतो याची प्रतीक्षा लागून आहे.

प्रतिभा कोडापे, गृहिणी

कोट

मागील वर्षी आणलेल्या कॉस्मेटिक्स अद्याप विक्रीअभावी पडून आहेत. एरव्ही एक-दोन लग्नसोहळे झाले की नवीन खरेदी करावी लागत होती. सतत लॉकडाऊनने सर्व बंदच आहे. यामुळे महिला घराबाहेर पडत नाहीत. परिणामी व्यवसाय करताना अडचणी येत आहेत. माझ्याकडे कार्यरत ब्युटिशियन महिला आणि कर्मचारी यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यासोबतच पाहिजे त्या प्रमाणात माल आणण्यास अडचण जात आहे. काही मालाची ऑर्डर दिल्यावर त्याचा वापर करण्यासाठी ठराविक कालावधी असतो. सततच्या लॉकडाऊनने हे साहित्य जागेवरच खराब होत आहे. यामुळे फटका बसत आहे. कोरोनाची स्थिती केव्हा जाईल. त्याच्यानंतरच व्यवसायाला गती येणार आहे.

- प्रियंका गेडाम, ब्युटीपार्लर व्यावसायिक.

कोट

काेराेना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर दिवाळीपासून ब्युटीपार्लरच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तीन ते चार महिने व्यवसाय बऱ्यापैकी चालला. मात्र, पुन्हा काेराेनाची दुसरी लाट आल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गाच्या भीतीपाेटी जिल्ह्यातील महिला पार्लरमध्ये जाण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येते.

- संजना नागदेवे, पार्लर व्यावसायिक, चंद्रपूर

Web Title: Mask removes lipstick blush!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.