महामार्गावरील आम्रवृक्षांची कत्तल
By admin | Published: June 14, 2014 11:29 PM2014-06-14T23:29:33+5:302014-06-14T23:29:33+5:30
नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचाच परिपाक म्हणून या आम्रवृक्षांची एकापाठोपाठ एक अशी कत्तल सुरु आहे.
रस्ते ओसाड : संवर्धनाचा बांधकाम विभागाला विसर
घनश्याम नवघडे - नागभीड
नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचाच परिपाक म्हणून या आम्रवृक्षांची एकापाठोपाठ एक अशी कत्तल सुरु आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर सावरगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आम्रवृक्षांची मोठ्या उत्साहात लागवड केली. काही वर्षांंनंतर ही आम्रवृक्ष चांगलीच बहरली. आंब्यांची ही झाडे मोठी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे बंद केले.
त्यामुळे आता या बहरलेल्या वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या झाडांची तोड करण्यात आल्याचे दिसून येते. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या अंतरावर किमना शंभर झाडे आहेत. मात्र कत्तलीमुळे ती उजाड झाली आहेत तर मोहित करणारे रस्तेही ओसाड झाल्याचे दिसून येते.
एकिकडे शासन वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असले तरी त्याची फलनिष्पत्ती शुन्य आहे. शासनाचा हा खर्च फूकट जात आहे. आणि शासनाचाच एक भाग असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या अखत्यारीत असलेली झाडे राखता येऊ नयेत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागभीड - तळोधी- सावरगाव या मार्गावरील झाडांचे निरीक्षण केल्यास अनेक झाड्याच्या मोठमोठ्या फांद्या अनेकांनी लंपास केल्याचे दिसून येत आहे.काही वेळेस हे चोरटे या झाडांच्या सालींमध्ये विशिष्ट द्रव्य टाकून ते झाडच सुकवतात आणि नंतर त्याची तोड करतात, अशी माहिती काही जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अनेकदा जिवंत झाडावरच्या फांद्यावरच घाव घालत असल्याची माहिती आहे.
वास्तविक या झाडांचे जतन व देखभाल करण्याची जबाबदारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. पण हा विभाग आपली जबाबदारी पार विसरत गेल्याचे एकंदर स्थितीवरुन दिसून येते.
या झाडांना किड लागू नये म्हणून गेरु, चुणा लावण्याचाही सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडत चालला आहे. वरिष्ठ कार्यालयाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.