चंद्रपुरात पाच दिवस चालणार माता महाकाली महोत्सव

By साईनाथ कुचनकार | Published: October 11, 2023 02:57 PM2023-10-11T14:57:45+5:302023-10-11T14:58:05+5:30

पाच दिवस महोत्सव : देवी गीत जागरणकार लखबीर सिंग लख्खा येणार

Mata Mahakali festival will last for five days in Chandrapur | चंद्रपुरात पाच दिवस चालणार माता महाकाली महोत्सव

चंद्रपुरात पाच दिवस चालणार माता महाकाली महोत्सव

चंद्रपूर : येथे १९ ऑक्टोबरपासून चंद्रपुरात सुरू होत असलेल्या पाचदिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जगप्रसिद्ध देवी गीत जागरणकार लखबीर सिंग लख्खा चंद्रपुरात येणार आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री महाकाली माता समितीच्या वतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही श्री महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी महोत्सव पाच दिवस चालणार असून, यादरम्यान महाकाली मंदिर जवळच्या पटांगणात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान २० ऑक्टोबरला सारेगामा फेम निरंजन बोबडे यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गायिका अनुराधा पौडवाल यासुद्धा महोत्सवाला येणार आहे. विशेष म्हणजे, विविध सांस्कृतिकसह कीर्तन, भजनही आयोजित करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आपल्या देवी गीत गायनाने जगात प्रसिद्ध असलेले लखबीर सिंग लख्खा यांच्या देवी जागरण गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. या कार्यक्रमाला महाकाली भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री महाकाली माता सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाकाली महोत्सवाचे मंडप पूजन

श्री माता महाकाली महोत्सवासाठी महाकाली मंदिराजवळील पटांगणात महोत्सवाकरिता येणाऱ्या भक्तांसाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. मंगळवारी महाकाली माता महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत मंडप पूजन केले. त्यांनतर येथील मंडप उभारणीला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी श्री महाकाली माता सेवा समितीचे उपाध्यक्ष अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, मोहित मोदी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Mata Mahakali festival will last for five days in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.