माथरा पाणीपुरवठा नळ योजना सात वर्षांनंतरही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:17 PM2018-03-23T23:17:42+5:302018-03-23T23:17:42+5:30

आठ वर्षांपूर्वी शासनाने माथरा येथे पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधली. त्या बांधकामावर लाखो रुपयांचा खर्च झाला. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.

Mathrila Water Supply Tot Scheme, even after seven years, thirsted | माथरा पाणीपुरवठा नळ योजना सात वर्षांनंतरही तहानलेलीच

माथरा पाणीपुरवठा नळ योजना सात वर्षांनंतरही तहानलेलीच

Next
ठळक मुद्देटाकीचे बांधकाम रखडले : नागरिकांचे पाण्यासाठी हाल

आॅनलाईन लोकमत
गोवरी : आठ वर्षांपूर्वी शासनाने माथरा येथे पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधली. त्या बांधकामावर लाखो रुपयांचा खर्च झाला. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्याचे स्त्रोत आटल्याने बोरवेलला पाणीच येत नाही. परिणामी ग्रामस्थांची भटकंती सुरु झाली आहे.
राजुरा तालुक्यातील माथरा गावाची लोकसंख्या ७५० आहे. गावात आठ वर्र्षांपूर्वी शासनाने पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधली. योजनेसाठी लाखो रुपये खर्ची घातले. पण, नळ योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागल्याने टाकीचे काम अर्ध्यावरच बंद पडले. प्रारंभी नळ योजनेचे काम धडाक्यात सुरु झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. घरापर्यंत पाणी पोहोचेल असे वाटत होते. पण, त्याचा हा आनंद काही दिवसांतच मावळला. पाणी घरापर्यंत येवू शकले नाही. स्थानिक नेत्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही यश मिळाले नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही. योजनेचे काम सुरु असताना अर्ध्यावरच बंद झाल्याने नागरिकांचा रोष अद्याप कायम आहे. वर्षाच्या आतच टाकीचे बांधकाम सुरु होईल आणि नागरिकांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, तब्बल आठ वर्षांचा कालावधी होवूनही टाकीचे काम अर्धवट असल्याचे दिसून येते. पाणी पुरवठा नळ योजनेच्या टाकीचे बांधकाम पूर्ण करून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी माथराचे सरपंच लहुजी चहारे यांनी संबंधित विभागाला अनेकदा निवेदने दिली.
अधिकाºयांशी वारंवार चर्चा करूनही नळ योजना थंडबस्त्यात आहे. आठ वर्षांच्या कालावधीनंतर टाकीची दुरवस्था संपली नाही. या घटनेला संबंधित विभागाचे अधिकारीच दोष आहेत, असा आरोप नागरिक करीत आहेत. मार्च महिन्यातच उन्हाच्या तप्त झळा बसू लागल्याने गावातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या.
माथरा गावात आजघडीला सहा शासकीय हातपंप आहेत. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंपाला पाणीच लागत नाही. त्यामुळे पाण्याची गरज कशी पूर्ण करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळत नाही. या परिसरात पाऊस कमी पडल्याने हिरवा चारा यंदा नाही. त्यातच पाणी टंचाई निर्माण झाल्याने जनावरांची गरज कशी भागवावी, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहेत.
बंद पडलेले बोअरवेल दुरूस्त केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकते. पाणी पुरवठा नळ योजनेवर लाखो रूपयांचा खर्च केला. पण, पिण्यासाठी पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. हे माथरा वासीयांचे दुदैव आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेवून संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी तातडीने या टाकीचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी माथरा येथील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

नळ योजनेच्या टाकीचे बांधकाम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरु करावा, यासाठी संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदन देण्यात आले होते. परंतु अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने टाकीचे बांधकाम रखडले. बांधकाम अर्धवट असल्याने पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष दिल्यास पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
- लहुजी चहारे,
सरपंच, माथरा

Web Title: Mathrila Water Supply Tot Scheme, even after seven years, thirsted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.