‘माया’ झाली ताडोबात पर्यटकांसाठी ‘सेलिब्रिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:04 PM2019-06-11T12:04:31+5:302019-06-11T12:07:18+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तिची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातील पर्यटक आतुर झालेले आहे.

'Maya' tigress turns out to be 'celebrity' for tourists in Tadoba | ‘माया’ झाली ताडोबात पर्यटकांसाठी ‘सेलिब्रिटी’

‘माया’ झाली ताडोबात पर्यटकांसाठी ‘सेलिब्रिटी’

Next
ठळक मुद्देएका झलकसाठी सारेच आतुरजगातील पर्यटकांना भुरळ

राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तिची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातील पर्यटक आतुर झालेले आहे. ताडोबात आलेला प्रत्येक पर्यटक गाईडला माया कुठे दिसते असे विचारून त्या ठिकाणी जाण्याचा आग्रह धरत आहे. मायानगरीची नसली तरी मायानगरीतील सेलिब्रिटींसह येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘ती व तिचे बछडे’ ताडोबातील सेलिब्रिटी झाली आहे.
ताडोबाच्या पर्यटनात दिवसागणिक वाढच होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याने यंदा तापमानाचा उच्चांक गाठला. असे असताना ताडोबाच्या पर्यटनावर काहीएक परिणाम झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून ताडोबा फुल्ल आहे. ताडोबात प्रवेश केल्यानंतर पर्यटकांचा एकच आग्रह सुरू आहे. तो म्हणजे मायाची एक झलक टिपण्याचा. मायाही पर्यटकांची इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. माया जेव्हा पर्यटकांपुढे येते तेव्हा एका ‘सेलिब्रिटी’सारखीच भासते. ती दिसताच पर्यटक अतिशय शांत राहतात. केवळ तिच्यावर आपले लक्ष केंद्रीत करून तिला डोळे भरून पाहण्याचा आनंद लुटताना दिसत आहे.
सोमवारी सकाळी पर्यटनाला सुरूवात झाल्यापासून काही वेळातच मटकासूर नावाने प्रसिद्ध असलेला वाघ पाणवठ्यावर आला. त्यानंतर काहीवेळातच त्याचे व मायाचे दोन बछडे त्या ठिकाणी आले. त्यांच्या पाठोपाठ माया ऐटीत एका ‘सेलिब्रिटी’सारखी त्या ठिकाणी पोहचली. मायाने आपल्या परिवारासह भेट दिल्याचा हा दुर्मिळ प्रसंग पर्यटकांना ताडोबात अुनभवाला आला. यानंतर माया आपल्या दोन्ही बछड्यांसह पाणवठ्यावर एकमेकांशी खेळत होती. दोन्ही बछड्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीही पर्यटकांसाठी पर्वणीच होती. ते बछडे आईच्या अंगावरून उड्यामारून पाण्यात जात होते. हे तिघेही सोमवारी सेलिब्रिटीच झाले होते. नॅशनल जिओग्राफीवर बघायला मिळणारे दृश्य प्रत्यक्ष ताडोबात पाहून पर्यटकांचा आनंद गगणात मावेनासा झाला. खºया अर्थाने मायाने पर्यटनाचा आनंद दिल्याचे पर्यटक आपसात कुजबुजत होते. सकाळी आपल्या बछड्यांसह आलेली माया दिवसभर तिथेच मुक्कामाला होती. ती व तिचे बछडे पाण्यात जायचे आणि परत झाडाखाली येऊन बसायचे. ‘याची देही याची डोळा’ बघितलेला प्रसंग दुसऱ्या जिप्सीतील पर्यटकांना सांगण्याचा मोह आवरत नव्हता. त्यामुळे काहीवेळातच सर्व जिप्सी पर्यटकांना घेऊन त्या ठिकाणी पोहचल्या. आणि मायाला बघूनच अनेकांनी आपले पर्यटन पूर्ण केले. काहींनी हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. पर्यटकांमध्ये या दुर्मिळ प्रसंगाचीच चर्चा रंगत होती.

वाघ आणि हरीण एकाच पाणवठ्यावर
आणखी एक गोष्ट ताडोबात पर्यटकांसाठी पर्वणीच ठरली ती म्हणजे पाणवठ्यावर लावलेल्या सोलरजवळ मायाचा एक बछडा पाण्यात बसला होता. अशातच हरणांचा कळप त्या ठिकाणी आला. त्यातील एकेक हरीण त्या वाघाच्या जवळून पाणवठ्यावर जात होते आणि आपली तृष्णा भागवित होते. हरीण पाणवठ्यावर जाताना निश्ंिचत दिसायचे. ऐरवी, वाघ आणि वाघाचे भक्ष्य म्हणून ओळखले जाणारे हरीण हे दोन्ही प्राणी कधीही एकाचवेळी एका ठिकाणी बघायला मिळत नाही. मात्र सोमवारी हे दृश्यही पर्यटकांना ताडोबात बघायला मिळाले. हा प्रसंग अविस्मरणीय असाच होता.

वनविभाग व मराठी पर्यटकांवर विदेशी पर्यटक खुश
ताडोबात दररोज देश-विदेशातून असंख्य पर्यटक येतात. सोमवारी इंग्लंडमधील एक पर्यटक सकाळपासून माया व तिच्या बछड्यांच्या एकेक हालचाली टिपत होता. पर्यटन झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या वनविभागाचे तोंडभरून कौतुक केले. सोबतच मराठी पर्यटक खूप चांगला आहे. अशी शाबासकीची थापही दिली. हा पर्यटक देश-विदेशातील व्याघ्र प्रकल्पांची भ्रमंती करतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या वनविभागासह मराठी पर्यटकांचे कौतुक केले.

Web Title: 'Maya' tigress turns out to be 'celebrity' for tourists in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ