मायानगरीत भरारी; पण पाय जमिनीवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:03 AM2018-04-07T00:03:48+5:302018-04-07T00:03:48+5:30

आशिष पाथोडे चित्रपटसृष्टीतील सध्या प्रसिद्ध होत असलेले नाव. तो आता मुंबईत स्थायिक झाला. मायानगरीतही बऱ्यापैकी स्थिरावला. मात्र आपल्या गावाची त्याला कमालीची ओढ. कामाच्या व्यस्ततेतूनही वर्षातून दोनदा तो गावी येतो.

Mayanagrari Bharari; But the feet on the ground! | मायानगरीत भरारी; पण पाय जमिनीवरच !

मायानगरीत भरारी; पण पाय जमिनीवरच !

googlenewsNext
ठळक मुद्देबालपणीच्या मित्रांसोबत गप्पा मारणे आवडते : सिनेकलावंत आशिष पाथोडेला स्वगावाची भुरळ

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : आशिष पाथोडे चित्रपटसृष्टीतील सध्या प्रसिद्ध होत असलेले नाव. तो आता मुंबईत स्थायिक झाला. मायानगरीतही बऱ्यापैकी स्थिरावला. मात्र आपल्या गावाची त्याला कमालीची ओढ. कामाच्या व्यस्ततेतूनही वर्षातून दोनदा तो गावी येतो. गल्लीबोळात फिरतो. आपल्या बालसंवगड्यांसोबत चहाटपरीवर गप्पा मारतो. आशिषने मायानगरीत भरारी घेतली असली तरी त्याचे पाय अद्याप जमिनीवरच असल्याचा प्रत्यय यातून दिसतो.
आशिष आसाराम पाथोडे हा नागभीडचा तरूण. त्याचे दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण नागभीडमध्येच झाले. अगदी बालपणापासूनच त्याला नृत्य आणि अभिनयाचे वेड. या वेडापायी त्याने घरच्यांचा विरोध असूनही पुण्यात ललित कला केंद्रातून अभिनयात पदवी मिळविल्यानंतर नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा या दिल्लीतील नामवंत संस्थेत प्रवेश मिळविला. अभिनयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. सुरूवातीलाच त्याने ‘दोपहरी’ व ‘कँडल मार्च’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. तसेच ‘क्राईम पट्रोल’ व ‘का रे दुरावा’ या टीव्ही मालिकेतही प्रमुख भूमिका साकारल्या. यासोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलावंतांना प्रशिक्षण देण्याचे कामही तो करीत आहे. यात इम्रान हाशमी, नर्गिस फकरी, प्राची देसाई, सोनाक्षी सिन्हा व इतर अनेक कलावंतांचा समावेश आहे. सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनपटावर आधारित असलेल्या ‘ठाकरे’ या सिनेमासाठी बाळासाहेबांची भूमिका साकारणाºया नामवंत कलाकार नवाजुद्दीन सिद्धिकी या कलाकारासुद्धा बाळासाहेबांचे चरित्र व त्यांची भाषा पडद्यावर साकारण्यासाठी तो ट्रेनिंग देत आहे. तोही यात भूमिका साकारत आहे. भरभक्कम यशाचा धनी असूनही आशिष नित्यनेमाने वर्षातून दोनदा गावात येतो. गावात चार भिंतीच्या आत न राहता गावात फिरतो. ज्या ठिकाणी त्याचे बालपणीचे सवंगडी तसेच दहावी बारावीपर्यंत सोबत शिकलेले मित्र भेटतील, त्यांच्याशी तिथेच बसून मनसोक्त गप्पा मारतो. मिळून चहा पितो. साधारणपणे तीन-चार दिवस गावात त्याचा मुक्काम असतो. या दिवसांत त्याची हीच दिनचर्या असते. नुकताच आशिष हनुमान जयंतीच्या दिवशी नागभीडला आला. सगळीकडे महाप्रसादाची रेलचेल होती. येताच आशिषने अनेक मंदिरांचे दर्शन तर घेतले. डोंगरगाव येथील कटाड्या मारोतीकडे जाऊन महाप्रसादाचा आस्वादही घेतला.

Web Title: Mayanagrari Bharari; But the feet on the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.