आज विराजमान होतील महापौर

By admin | Published: April 30, 2017 12:30 AM2017-04-30T00:30:26+5:302017-04-30T00:30:26+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ३० एप्रिलला निवडणूक घेण्यात येत आहे.

The mayor will sit today | आज विराजमान होतील महापौर

आज विराजमान होतील महापौर

Next

उपमहापौरांचीही निवड : मनपाच्या सभागृहात निवडणूक
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ३० एप्रिलला निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र ही निवडणूक केवळ औपचारिकता असून भाजपाच्या अंजली घोटेकर या महापौरपदी विराजमान होईल, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. याच दिवशीे उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापतींचीही निवड होणार आहे.
मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात केवळ ५२ टक्केच मतदान झाले. २१ एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी झाली. यात भाजपाने प्रारंभीपासूनच आघाडी घेतली होती. ६६ पैकी ३६ उमेदवार निवडून आल्याने भाजपाने सत्ता स्थापनेसाठी होणारा वादविवाद तेथेच संपवून टाकला. मागील पंचवार्षिकमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या १६ होती. यंदा यात दुपटीने वाढ होत ती संख्या ३६ च्या घरात पोहचली आहे. काँग्रेसची मात्र मोठी घसरण झाली. मागील पंचवार्षिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आला होता. तब्बल २६ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र काँग्रेसला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसला हादरा आणि भाजपाची मुसंडी हा केवळ एकच बदल झालेला नाही. यंदा मतदारांनी अनेक विद्यमान नगरसेवकांना पसंदी दर्शविली नाही. विद्यमान नगरसेवकांपैकी यंदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या तब्बल २५ नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला नाही. त्यामुळे त्यांना पुढील पाच वर्ष घरीच बसावे लागणार आहे. मोठ्या प्रमाणात विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी नाकारले असले तरी १७ विद्यमान नगरसेवकांवर जनतेने पुन्हा विश्वास ठेवला आहे. त्यांना या निवडणुकीत निवडून देऊन परत एकदा सभागृहात पाठविले आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना मनपाचे कारभारी म्हणून नेमले आहे. असे तब्बल ४९ नवे चेहरे मनपात नगरसेवक म्हणून दाखल झाले आहे. महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे मनपात महिला राज येईल, हे महापौर पदाच्या आरक्षणानंतरच स्पष्ट झाले होते.
महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या अंजली घोटेकर यांनी आपले नामांकन दाखल केले आहे तर बसपाच्या रंजना यादव यांनीही आपले नामांकन दाखल केले आहे. उपमहापौर पदासाठी भाजपाचे अनिल फुलझेले यांनी नामांकन दाखल केले आहे. उद्या ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. मात्र ही निवडणूक केवळ औपचारिकता असणार आहे. मनपा निवडणुकीत भाजपाने ६६ पैकी ३६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे भाजपाच्या अंजली घोटेकर याच महापौरपदी विराजमान होईल, हे निश्चित झाले आहे. उपमहापौरपदी अनिल फुलझेले हे विराजमान होतील.
महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर एक-दोन तासातच स्थायी समिती सभापती पदाची निवड केली जाणार आहे. स्वीकृत सदस्यांचीही निवड याच दिवशी केली जाऊ शकते अशी माहिती आहे.

ना. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक
राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज शनिवारी चंद्रपुरात मुक्कामी आहेत. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी आज रात्री ९.३० वाजता भाजपाच्या विजयी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीतच मनपाचे स्थायी समिती सभापती व स्वीकृत सदस्य कोण असेल, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
स्वीकृत सदस्य समाजातून निवडावे
महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होते. हे सदस्य समाजातील पर्यावरण, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील गणमान्य व्यक्त असावे, अशी मार्गदर्शक तत्वे आहेत. ते राजकारणातील व्यक्ती नसावे. त्यामुळे यावेळी अशा व्यक्तींची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी, अशी मागणी ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे प्रा.सुरेश चोपणे यांनी केली आहे.

Web Title: The mayor will sit today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.