महापौर आरक्षणात पुरुषांना फटका
By admin | Published: February 4, 2017 12:32 AM2017-02-04T00:32:29+5:302017-02-04T00:32:29+5:30
राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी मुंबई येथे काढण्यात आली.
ओबीसी महिला राखीव : पुन्हा एकवार भंगले स्वप्न
चंद्रपूर : राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी मुंबई येथे काढण्यात आली. यात चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद पुन्हा ओबीसी महिलासाठी राखीव आल्याने या आरक्षणाकडे लक्ष ठेवून असलेल्या पुरुषांना दुसऱ्यांदा फटका बसला आहे. मागील पंचवार्षिकमध्येही हे पद महिलांसाठीच राखीव होते. यावेळीही महिलांसाठीच राखीव असल्याने इच्छुक पुरुषमंडळीचे स्वप्न पुन्हा एकवार भंगले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. राज्यभरातील महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिका विलंबाने अस्तित्वात आल्याने या महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असा अंदाज आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या तीन लाख २० हजार ३७९ आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ६१ हजार १६४, अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ हजार ७९४ इतकी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले होते. या ३३ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. याप्रमाणे मतदारांनी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले. मात्र यावेळी यात बदल झाला आहे.
२२ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी शासनाने पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. दरम्यान, जुन्या ३३ प्रभागाचे रुपांतर १७ प्रभागामध्ये केल्यामुळे नगरसेवकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. यात अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील बहुतांश भाग दुसऱ्या प्रभागात गेला आहे. सिव्हील लाईन हा प्रभाग आता जटपुरा प्रभागात विलीन झाला आहे. या सिव्हील लाईन प्रभागातील मित्रनगर परिसर वडगाव प्रभागात तर सिंधी कॉलनी परिसर नगिनाबागमध्ये गेला आहे. पूर्वी नगिनाबाग प्रभागात असलेला जगन्नाथबाबा नगर, रेव्हन्यू कॉलनी, जीवनज्योती कॉलनी हा परिसरही वडगाव प्रभागात विलीन झाला आहे.
यासोबतच पूर्वीच्या बाजार वॉर्ड प्रभागातील काही भाग महाकाली प्रभागात गेला आहे. विशेष म्हणजे, असा प्रकार जवळजवळ सर्वच प्रभागाबाबत घडला आहे. प्रस्थापित नगरसेवकांनी पाच वर्ष ज्या परिसरात कामे केली, नागरिकांशी जनसंपर्क वाढविला, नेमका तोच परिसर दुसऱ्या प्रभागात गेल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान नगरसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. या प्रभाग रचनेवर काही नगरसेवकांनी आक्षेपही नोंदविला आहे. दरम्यान, आज गुरुवारी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात चंद्रपूर महापौर पद पुन्हा ओबीसी महिलासाठी राखीव झाले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये पुरुषांना आरक्षणामुळे महापौर पद उपभोगता आले नाही. त्यामुळे यावेळीतरी तशी संधी मिळेल म्हणून अनेकजण या आरक्षणाकडे लक्ष ठेवून होते. मात्र यावेळीदेखील त्यांच्या स्वप्नांचा आरक्षणाने चुराडा केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे इच्छुक महिला उमेदवारांमध्ये मात्र आनंदोत्सव साजरा होत आहे. (शहर प्रतिनिधी)
अमृतकर बनल्या पहिल्या महापौर
महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर महापौर पद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. त्यामुळे काँग्रेसच्या संगीता अमृतकर या चंद्रपूरच्या पहिल्या महापौर म्हणून विराजमान झाल्या. संगीता अमृतकर यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली. यात पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित झाले. पुन्हा पुरुषांचे स्वप्न भंगले. त्यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या राखी कंचर्लावार यांनी भाजपात प्रवेश करून महापौर पदी विराजमान झाल्या.