ताडोबातील ‘मयुरी’ वाघिणीच्या घातपाताची शक्यता बळावली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 02:42 AM2020-11-07T02:42:50+5:302020-11-07T06:41:55+5:30
Tadoba Andhari National Park: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पांतर्गत खडसंगी बफर वनपरिक्षेत्रात वाघिणीचे तीन बछडे आईपासून भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला, तर दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत.
- राजकुमार चुनारकर
चिमूर (जि. चंद्रपूर) : गेले दहा दिवस जंग जंग पछाडूनही बेपत्ता मयुरी वाघिणीचा मागमूस न लागल्याने या वाघिणीसोबत घातपात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पांतर्गत खडसंगी बफर वनपरिक्षेत्रात वाघिणीचे तीन बछडे आईपासून भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला, तर दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत. तेव्हापासून वनविभाग वाघिणीचा कसून शोध घेत आहे.
मयुरीकडून बछड्यांचा शोध नाही
छड्यांपासून दूर असलेली वाघीण आक्रमक होते. अशा परिस्थितीत ती बछड्यांच्या शोधात शिवारात किंवा गावात येऊ शकते. मात्र, तसे काहीही झालेले नाही.
मयुरी बछडे असलेल्या परिसरात आली नाही की कुठे कॅमेऱ्यात कैद झाली नाही. त्यामुळेच वाघिणीसोबत घातपात तर झाला नसेल ना, अशी चिंता वन विभाग व वन्यजीवप्रेमींना सतावत आहे. वनविभागही त्या दिशेने तपास करीत आहे.
‘जय’ची पुनरावृत्ती होणार का?
आशिया खंडातील सर्वात मोठा समजला जाणारा ‘जय’ वाघ २०१६ मध्ये उमरेड-कऱ्हांडला जंगलातून असाच अचानकपणे गायब झाला. अजूनही तो सापडला नाही. त्यामुळे जयबाबत जे घडले, तेच मयुरीबाबत घडल्याची चर्चा आहे.