वेकोलि खाणीमुळे माजरी प्रदूषणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:59+5:30
वेकोलिच्या खुल्या खाणीत उत्पादन झालेल्या कोळशाचे मोठे दगड क्रेशर मशीनद्वारे बारिक करीत असताना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. परिसरात वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दरम्यान, पीडित नगरिकांनी आमचे पुनर्वसन करा. अन्यथा वेकोलि प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे.
राजेश रेवते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोलि माजरीच्या नागलोन २ या खुल्या कोळसा खाणीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे व या खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेकांची घरे पडली. अनेकांच्या घरांना भेगा पडल्या आहेत. तसेच कोळसा उत्पादनाकरिता मोठे-मोठे मातीचे ठिगारे उभे केल्याने गावात वस्तीलगत वेकोलिचे रसायनयुक्त पाणी साचले आहे. साचलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे अनेकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वेकोलिच्या खुल्या खाणीत उत्पादन झालेल्या कोळशाचे मोठे दगड क्रेशर मशीनद्वारे बारिक करीत असताना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. परिसरात वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दरम्यान, पीडित नगरिकांनी आमचे पुनर्वसन करा. अन्यथा वेकोलि प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे.
स्थानिक नागरिकांना भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान वायु प्रदूषणामुळे माजरी परिसरात बहुतांश नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे आजार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार तसेच अन्य विकार जडत आहेत. या सर्व समस्या लक्षात घेत माजरी क्षेत्रातील अनेक नागरिक, लोकप्रतिनिधींनी वारंवार या समस्याची तक्रार जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, वेकोलिचे डायरेक्टर पर्सनल, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र या समस्याकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
यांच्या घरांचे नुकसान
वेकोलिच्या ब्लॉस्टिंगमुळे वार्ड क्र.१ मधील कैलाश मेश्राम, चंद्रभान गिन्नाके, ताराबाई मेश्राम, लिलाबाई मेश्राम, सुधाकर गेडाम, सुमनबाई येलादे, लक्ष्मी चांदेकर, मारोती नगराळे, खेमराज आत्राम, सुनिता आत्राम, शकून मडावी, सुमन मडावी, चंद्रकला शास्त्रकार, जिजाबाई जुमनाके, गीता जुमनाके, मीराबाई पेंदोर यांचे घर कोसळले आहे तर काही घरांना भेगा पडून मोठे नुकसान झाले आहे.
ढिगाऱ्याला लागते आग
या खुल्या खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्याला अनेकवेळी आगी लागतात. अशावेळी तेथील विषारी धुरांमुळेसुद्धा माजरी परिसरात प्रदूषण मोठया प्रमाणात वाढले आहे. वेकोलि अधिकाऱ्यांना या संदर्भात अनेकदा विचारले असता आम्ही उपाय योजना करीत आहोत, असे सांगून टाळाटाळ केली जाते. वेकोलि प्रशासनाला याबाबत दखल घेवून तोडगा काढण्यासाठी वारंवार पत्र दिले. मात्र वेकोलि याकडे दुर्लक्ष करीत आहे.