क्षणार्धात ‘त्यांच्या’ नशिबी आले उघड्यावरचे जिणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:19 AM2017-12-22T00:19:30+5:302017-12-22T00:19:43+5:30
शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाऱ्या प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
जीवती : शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाºया प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. क्षणार्धात अख्ये गाव सुनसान झाले. कुणी नातलगाचा आश्रय घेऊन गुराच्या पडक्या गोठ्यात आपले बस्तान मांडले तर कुणी आपल्याच जुन्या पडक्या घरात बस्तान मांडले. ‘लोकमत’ने गुरुवारी या गावाला भेट दिली असता त्यांचे उघड्यावरचे जिणे व आक्रोशच दिसून आला.
जीवती तालुक्यातील नोकेवाडा ग्रामपंचायतमधील सेवादासनगर येथील काही नागरिकांनी शेती करण्यासाठी त्रास होत असल्याने दहा वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यातील कोलामानजिक व त्याच्या शेताच्या बाजुलाच ११ घरांची वस्ती थाटली होती. सर्व काही सुरळीतपणे चालत असताना जमापुंजी खर्च करून उभारलेल्या कुडा-मातीच्या घरात त्यांचे मनही रमले होते. मात्र या सुखी संसाराला आरक्षणाची कीड लागली अन् क्षणार्धात त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. काही तासातच घर असलेली कुटुंबे बेघर झाली. पोलिसांच्या साक्षीने आपला बिºहाड जुनी वस्ती सेवादासनगरमध्ये हलविला. पण राहायचे कुठे हा प्रश्न पडला असताना त्यांचे नातलग त्यांच्या मदतीला धावून आले आणि आपल्याच गुराच्या गोठ्यात राहण्यासाठी आश्रय दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट दिली असता विदारक स्थिती बघायला मिळाली. आपली व्यथा सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाही. एकीकडे चुल तर त्याच शेजारी मुल घेऊन चिंतेत पडलेल्या कुटुंबातील माणसं बसली होती. धनराज आडे, विश्वनाथ आडे, रघुनाथ आडे, वैजनाथ आडे, प्रभु जाधव, उत्तम जाधव या ग्रामस्थांनी ‘लोकमत’जवळ व्यथा मांडली.
जगण्यासाठी संघर्ष सुरूच
सेवादासनगर येथून तेलंगणाच्या कोलामानजिक जाऊन शेती करणे आम्हाला खूप कठीण झाले होते. पावसाळ्यात तर खूप त्रास व्हायचा. कधी-कधी तर अंधारही व्हायचा. आम्ही घरी येईपर्यंत आमची मुले उपाशी राहायची. त्यामुळे आम्ही शेतालगत घरे उभारून जगण्याचा निर्णय घेतला होता. जगण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा होता की आमचे नशीबच फुटके होते माहित नाही. गेली अनेक वर्ष भटंकती करण्यात गेली. आजही भटकंती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशा शब्दात आपली करूण कहानी गावकºयांनी सांगितली.
अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणार
या गावचे सरपंच विमल राठोड, जि.प. सदस्य कमल राठोड तसेच पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्याशी चर्चा केली असता प्रेमनगरातील नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला असून त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.