भद्रावती येथे मध्यस्थी जनजागृती
By admin | Published: June 25, 2017 12:40 AM2017-06-25T00:40:26+5:302017-06-25T00:40:26+5:30
मेडीएशन मॉनिटरिंग कमिटी, मेन मेडीएशन सेंटर, उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये...
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : मेडीएशन मॉनिटरिंग कमिटी, मेन मेडीएशन सेंटर, उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती भद्रावती व तालुका विधिज्ञ संघ भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे ‘मध्यस्थी जनजागृती’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश निनाद अ. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर रिर्सोस पर्सन म्हणून शैलेश कंठे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष यू.ए. पलीकुंडावार व सचिव अॅड. जी.पी. मोरे उपस्थित होते.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश शैलेश कंठे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, मध्यस्थी म्हणजे जो पक्षकारामधील असणारा वाद, तंटा परस्पर संमतीने सोडविण्याकरिता मदत करतो. मध्यस्थी एक गोपनीय, ऐच्छिक परस्पर सहभाग असणारी लवचिक प्रक्रिया आहे.
मध्यस्थी कोणताही तोडगा थोपवित नाही. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वकिलांचा सहभाग देखील अत्यंत महत्त्वाचा असून किंबहूना मध्यस्थीद्वारे संपविणे, याबाबतचे योग्य मार्गदर्शन हे वकील पक्षकारांना करीत असतात तसेच मानसिकदृष्ट्या समाधान मिळून, विविध मुद्यातील दरी कमी करून ‘जिंकलो व हरलो’ असा भाव न राहता सन्मानपूर्वक निकालाचा अवलंब करून, दुरावलेली मने पुन्हा स्नेहात बांधली जातात.
मध्यस्थीमुळे लवकर निकाल लागून सामाजिक स्वास्थ सुधारते, सौहार्दाता वाढते, कमी खर्च, पैशाची व वेळेची बचत तसेच संपूर्ण कोर्ट फी परत मिळून पक्षकारांना याचा लाभ होतो. वैवाहिक प्रकरणातील असलेले हेवे-दावे मिटविण्याचा प्रयत्न किंवा नात्यातील गोडवा पुन्हा प्रस्थापित करण्याकरिताच आपला प्रयत्न नव्याने संसाराची घडी बसविणेसाठी पती-पत्नीमधील वाद न्यायालयात असण्यापेक्षा मध्यस्थी मार्फत मिटविणे योग्यच होईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अॅड. व्ही.एस. सूर्तीकर यांनी केले.