क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चार पदाचा भार; क्षयरुग्ण वाऱ्यावर
By परिमल डोहणे | Published: May 26, 2024 07:28 PM2024-05-26T19:28:34+5:302024-05-26T19:28:55+5:30
तज्ज्ञ सेवेपासून राहावे लागते वंचित.
चंद्रपूर : जिल्हा क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांना सन २०१९ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती दिली आहे. यासोबतच सन २०२३ पासून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा प्रशासकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभारही देण्यात आला आहे. एवढेच नाही तर जिल्हा शल्यचिकित्सक सुट्ट्यावर गेल्यास त्याठिकाणी अतिरिक्त शल्यचिकित्सक असतानासुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक पदाचाही कारभार त्यांच्याकडेच सोपवण्यात येतो.
एकीकडे क्षयरुग्णांची संख्या वाढत असतानाही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर शल्यचिकित्सक कार्यालयात बसविल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यांकडे चारचार प्रभार दिल्याने मोठे अर्थकारणही दडले असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. डॉ. हेमचंद कन्नाके यांची जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी गट-२ म्हणून नियुक्ती आहे. मात्र ९ डिसेंबर २०१९ पासून डॉ. कन्नाके यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) म्हणून प्रतिनियुक्ती दिली आहे.
त्यामुळे मागील साडेचार महिन्यांपासून ते आपली सेवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात देत आहेत. मात्र त्यांचे वेतन जिल्हा क्षयरोग केंद्रातून निघत आहे. असे असतानासुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक सुट्यांवर गेल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग १, वर्ग २ चे अधिकारी यासोबतच अतिरिक्त शल्यचिकित्सक असतानासुद्धा कन्नाके यांच्याकडेच जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कारभार नेहमीच सोपवण्यात येतो. कन्नाके यांची मूळ पदस्थापना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील नसूनही त्याच्याकडे प्रशासकीय कारभार सोपविण्यात येत असल्याने रुग्णालयातील वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
क्षयरुग्णतज्ज्ञ सेवेपासून वंचित
डॉ. हेमचंद कन्नाके यांनी ‘डिप्लोमा इन टीबी ॲन्ड चेस्ट’ चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांची पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमानंतर तज्ज्ञसेवा देण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षणाचा क्षयरुग्णांना मोठा फायदा झाला असता. मात्र त्यांना प्रतिनियुक्ती दिली असल्याने ते जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात बसत असतात. त्यामुळे सुमारे साडेचार वर्षांपासून क्षयरुग्णांना तज्ज्ञ सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
आयुक्तांकडे तक्रार
नियमांचे उल्लंघन करून एकाच व्यक्तीला अनेक प्रभार देण्यात आला असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय चंद्रपूर येथे गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत प्रतिनियुक्तीवर असलेल्या कन्नाचे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून मूळ पद जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथे नियुक्ती करावी, अशी मागणी रुग्णालयाची वर्ग एक अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालक तसेच आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात एसीएस नसल्याने तसेच त्या विभागातून विनंती करण्यात आल्याने कन्नाके यांना प्रतिनियुक्ती दिली आहे. अद्याप माझ्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. -डॉ. कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य विभाग