मेडिकल ऑक्सिजन ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर ठेवले बोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 05:00 AM2021-05-08T05:00:00+5:302021-05-08T05:00:36+5:30
कोविड रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये. जिल्ह्याला उपलब्ध होणारा ऑक्सिजन डीसीएच व डीसीएचसी रूग्णालयांनी नियमानुसारच वितरण करावे. अजिबात गळती होऊ नये, यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्यात आले. त्रुटी आढळल्यानंतर त्या सात दिवसात दुरूस्ती करण्याच्या सूचना तज्ज्ञ पथकाने दिल्या. टेक्निकल व क्निनिकल ऑडिटमुळे ऑक्सिजन गळती दूर करून योग्य व्यवस्थापन करता येईल. कोविड रूग्णांना वैद्यकीय निकषानुसार ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना जीवदान देणारे ऑॅक्सिजन एक औषधच आहे. त्यामुळे औषध विज्ञान आरोग्य निकषानुसार जिल्ह्यातील डीसीएच व डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑक्सिजन वितरण होते की नाही, याबाबत नुकतेच ऑडिट झाले. ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर बोट ठेवून त्या सात दिवसांत दूर करण्याच्या सूचना दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात ३२ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. सध्या स्थितीत ३० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने उर्वरित दोन मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सोडविला. त्यामुळे सध्या तरी मागणीच्या तुलनेत ऑक्सिजन तुटवडा नाही. फक्त ऑक्सिजनयुक्त बेड्सची समस्या तातडीने सोडविल्यास कोविड रुग्णांना उपचार होऊ शकतात. यातून बाधित मृतांच्या संख्येलाही ब्रेक लागू शकतो. जिल्ह्यात ५ डीसीएच व ३१ डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयांना ३० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामध्ये ३१ खासगी रुग्णालयाचाही समावेश आहे. उपलब्ध असलेला ऑक्सिजन रुग्णांना योग्यरीत्या मिळतो किंवा नाही, यासाठी टेक्निकल व क्निनिकल ऑडिट करण्यात आले. ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर बोट ठेवले. या त्रुटी सात दिवसांत दूर करावे आणि नवीन फॉरमॅटनुसार दररोज माहिती सादर करण्याचे निर्देश हॉस्पिटलला दिले.
शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करताना सुरुवातीलाच लक्ष घालण्यात आले. त्यामुळे त्रुटींची संख्या कमी असल्याचे समजते. ऑडिट पथकाने सूचना दिल्याने जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटलने त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेतले आहे.
कोविड रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये. जिल्ह्याला उपलब्ध होणारा ऑक्सिजन डीसीएच व डीसीएचसी रूग्णालयांनी नियमानुसारच वितरण करावे. अजिबात गळती होऊ नये, यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्यात आले. त्रुटी आढळल्यानंतर त्या सात दिवसात दुरूस्ती करण्याच्या सूचना तज्ज्ञ पथकाने दिल्या. टेक्निकल व क्निनिकल ऑडिटमुळे ऑक्सिजन गळती दूर करून योग्य व्यवस्थापन करता येईल. कोविड रूग्णांना वैद्यकीय निकषानुसार ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
- मनोहर गव्हाळ, निवासी उपजिल्हाधिकारी
तथा नोडल अधिकारी ऑक्सिजन वितरण, चंद्रपूर
एका ऑक्सिजन प्लांटचे टेंडर निघाले
कोविड रूग्णांना तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी तालुकास्थळी १० पीसीए प्लांट आणि जिल्हास्थळी क्रायोजेनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. यातील एका प्रकल्पाचे टेंडर निघाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे.
असे आहे ऑडिट पथक
राज्याच्या तांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे संचालक व व्यावसायिक शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मेडिकल ऑक्सिजन पथक गठित करण्यात आले. या पथकात चंद्रपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती दररोजच अहवाल जिल्हाधिका-यांकडे सादर करते. क्निनिकल ऑडिटसाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिका-यांचा सहभाग असतो.
अशा आहेत त्रुटी व सूचना
- ऑक्सिजन वितरणाचे लॉकबूक ठेवावे
- तात्पुरते नव्हे तर ॲन्युअल मेन्टेन्स करावे
- ऑक्सिजन सिलिंडर व्यवस्थित लावावे
- व्हाॅल्वद्वारे रूग्णांना योग्य पुरवठा होतो काय
- सरासरीपेक्षा जास्त ऑक्सिजन देऊ नये
- प्रशिक्षित मनुष्यबळ नियुक्त करावे
- ऑक्सिजन गळती बंद करावी
- दररोजचा अहवाल तयार करावा
- ऑक्सिजन संयंत्राची पाहणी व व्यवस्थापन
- ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड्सची माहिती द्यावी
- परिचारिकांना प्रशिक्षण द्यावे
- ऑक्सिजनबाबतच्या सर्व यंत्रणा अपडेट ठेवा