आदिवासी विकास महामंडळाच्या रोजंदारी कामगारांची बैठक
By admin | Published: July 12, 2014 11:35 PM2014-07-12T23:35:38+5:302014-07-12T23:35:38+5:30
महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रादेशिक विकास महामंडळात प्रदीर्घ कालावधीपासून रोजंदारी सेवेत कार्य असलेल्या कामगारांची बैठक महाकाली मंदिर देवस्थान येथे कृती समितीचे अध्यक्ष दिवाकर कुळसंगे
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रादेशिक विकास महामंडळात प्रदीर्घ कालावधीपासून रोजंदारी सेवेत कार्य असलेल्या कामगारांची बैठक महाकाली मंदिर देवस्थान येथे कृती समितीचे अध्यक्ष दिवाकर कुळसंगे आणि अ.भा.आ.वि.प.चे विदर्भ सचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला विदर्भातील रोजंदारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी विकास महामंडळात २० वर्षांपेक्षा अधिक सेवा कालावधी लोटूनदेखील आजघडीला रोजंदारी तत्वावर काम करावे लागत आहे. सेवेत कायम न केल्यामुळे कामगारांना आर्थिक संकटाशी संघर्ष करावा लागत आहे. अनेक शासकीय सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. वन विभाग रोजंदारी कामगार नियमित करण्याच्या नियमाप्रमाणे आम्हाला देखील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यरत सेवापदी नियमित करण्यात यावे, या मागणीचा युद्धपातळीने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यात यावा या उद्देशाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांच्या पुढाकारातून रोजंदारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहेत. निश्चितच न्याय मिळेल असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
तिराणिक यांनीदेखील आदिवासी विकास महामंडळातील रोजंदारी कामगाराच्या नियमित करण्याबाबतच्या समस्येची दखल घेत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर तर संबंधित मंत्री आणि अर्थसहाय्य विभागाच्या प्रशासकीय अधिकारी, उच्च अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहुन पाठपुरावा केला आहे. (प्रतिनिधी)