चंद्रपूरच्या रुग्णालयातील समस्यांवर मुंबईत झाली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:49+5:302021-08-26T04:30:49+5:30
चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामाच्या समस्यांबाबत मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या दालनात बैठक पार पडली. ...
चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामाच्या समस्यांबाबत मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विकासमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, दूरदृश्यप्रणालीव्दारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यासह एचएससीसी या कंपनीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत, जेवढे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यामध्ये विद्युतीकरण व पाणीपुरवठा ही सुरळीत करण्यात यावा व पूर्ण झालेल्या इमारती शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात. शासकीय महाविद्यालयाचा पाण्याचा प्रश्नदेखील तातडीने सोडवावा. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता पूर्णवेळ अधिष्ठाता पदाची भरती व्हावी, हाफकीनकडून जी औषधे खरेदी केली जातात त्याबाबतच्या नियमावलीमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. रुग्णालयातील समस्या सोडविण्यासह पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन ना. अमित देशमुख यांनी दिले.