काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज मेळावे, रॅली
By Admin | Published: October 8, 2016 12:46 AM2016-10-08T00:46:09+5:302016-10-08T00:46:09+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांच्या ....
विविध प्रश्नांवर धरणे आणि मोर्चा : राजुऱ्यात कार्यकर्ता मेळावा
चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांच्या ८ आॅक्टोबरच्या चंद्रपूर दौऱ्याच्या निमीत्ताने काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरातील विराट मोर्चानंतर प्रथमच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी चंद्रपुरातून राज्य सरकारच्या विरोधात हाक दिली आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेली रॅली आणि या रॅलीतून राज्य सरकारविरोधात फुंकला जाणारा असंतोषाचा बिगूल राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.
प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारल्यावर अशोक चव्हाण यांचा हा पहिलाच चंद्रपूर दौरा आहे. त्यामुळे अलिकडे काहीश्या मरगळलेल्या वातावरणानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण दिसत आहे. या दौऱ्याच्या निमीत्ताने चंद्रपूर, राजुरा या दोन ठिकाणी जंगी कार्यक्रमांची आखणी झाली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर झालेले हे आयोजन राजकीयदृष्ट्या चर्चेचे ठरत आहे.
माजी खासदार नरेश पुगलिया यांनी राज्य सरकारविरोधात विविध प्रश्नांवर स्थानिक गांधी चौकात या दिवशी दिवसभर धरणे आयोजित केले आहे. सकाळी ११ वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत विदर्भ किसान मजदूर संघाच्या पुढाकारात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ्रजिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली पोहचून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. यात विविध स्तरातील नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
राजुरा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकारात दुपारी १२ वाजता महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रांगणात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण असून माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होत आहे. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, बाबूराव तिडके, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, एस. क्यू. जामा आदींची यावेळी प्रामुख्याने उपथिती राहणार आहे.
याच दरम्यान, राजुरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरातील दाताळा रोडवरील बाजार समिती परिसरात शेतकरी व महिला बचतगट मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्ते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे तसेच आमदार विजय वडेट्टीवार व माजी आमदार सुभाष धोटे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती जिल्हा बँक अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)