एमईएलच्या मॅगनिजची हेराफेरी
By admin | Published: July 17, 2014 11:58 PM2014-07-17T23:58:43+5:302014-07-17T23:58:43+5:30
विदर्भातील नामंकित एमईएल प्रकल्पातून भिलाई स्टील प्लँटसाठी जाणाऱ्या सिलिको मॅगनिजची हेराफेरी सेंट्रल एक्साईजने उघडकीस आणली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज जवळील
सेंट्रल एक्साईजची धाड : गडचिरोलीच्या जंगलात होता अड्डा
चंद्रपूर : विदर्भातील नामंकित एमईएल प्रकल्पातून भिलाई स्टील प्लँटसाठी जाणाऱ्या सिलिको मॅगनिजची हेराफेरी सेंट्रल एक्साईजने उघडकीस आणली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज जवळील बोदेकसा गावाजवळील या हेराफेरीचा अड्डा नक्षल विरोधी पथकाच्या मदतीने शोधण्यात यश आले असून साडेपाच टन वजनाचे सिलिको मॅगनिज पोलिसांच्या मदतीने जप्त केले आहे.
सेंट्रल एक्साईजच्या या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथील कर चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यामुळे एमईएल स्टील प्लँटमध्ये नेमके चालते तरी काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.
सेंट्रल एक्साईजच्या सूत्रांनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नक्षल विरोधी पथकातील जवानांच्या मदतीने बोदेकसा गावाजवळील अड्ड्यावर धाड घातली. यात साडेपाच टन सिलिको मॅगनिज जप्त करण्यात आले. यासोबतच बॅग शिवण्याची शिलाई मशीन, वजनकाटाही जप्त करण्यात आला.
एमईएलमधून सिलिको मॅगनिज घेऊन भीलाई स्टील प्लँटकडे निघालेला ट्रक घटनेच्या रात्री येथे रिकामा करण्यात आला होता. येथे चालणाऱ्या हेराफेरीची गुप्त माहिती सेंट्रल एक्साइजच्या अधिकाऱ्यांना होती. त्यावरून सापळा रचून ही धाड घालण्यात आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)