लग्नसोहळ्यात संगीताचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:25+5:302021-02-16T04:29:25+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटानंतर आता पुन्हा धूमधडाक्यात विवाह सोहळे आयोजित केले जात आहे. मात्र लग्नसोहळ्यातील सनईचे सूर ...
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटानंतर आता पुन्हा धूमधडाक्यात विवाह सोहळे आयोजित केले जात आहे. मात्र लग्नसोहळ्यातील सनईचे सूर काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक काळात डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या वऱ्हाडांना विवाह सोहळ्यात चित्रपट गीतांपासून नृत्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘स्वरांजली’ची खास मेजवानी ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही लग्न समारंभासाठीही प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत होती. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पुन्हा लग्नसोहळे धूमधडाक्यात तसेच डीजेच्या आवारात साजरे होऊ लागले.
विवाह प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा क्षण. दोन वेगळे जीव साता जन्माच्या गाठीने एका विवाह बंधनात आयुष्यभरासाठी बांधले जातात. त्यांच्या भावी वाटचालीकरिता वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी नातलग, सगेसोयरे इष्टमित्रांना निमंत्रण दिले जाते. रीतिरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा थाटात पार पाडला जातो.
लग्नसोहळ्यात पूर्वी सनईचा सूर सर्वांच्या कानी पडायचा. त्या सनई चौघड्याचा रुबाब काही औरच होता. मात्र आधुनिक युगात सनई चौघड्यांची जागा डीजेनी घेतली. लग्नसोहळ्यात डीजेच्या तालावर मंडळींना विवाह मुहूर्ताचे भान राहत नाही. परिणामी त्याचा नाहक त्रास वधूपित्याला सहन करावा लागतो.
लग्नसोहळ्यात खास मेजवानी म्हणून गाण्यांची मैफल आयोजित केली जाते. यामध्ये एकापेक्षा एक गाण्यांची जुगलबंदी सादर करणारे कलावंत मंडळींना अक्षरश: भारावून टाकत असल्याने विवाह सोहळ्याची रंगत काही औरच असते. त्यामुळे लग्नसोहळ्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
वधूपित्याची मोठी कसरत होत असली तरी, वधूपित्याला आपल्या मुलीचे शुभमंगल थाटात पार पाडावे, असे वाटत असल्याने विवाह सोहळ्याचे रूप पूर्णत: बदलले आहे.