गोंदिया-बल्लारशाह मार्गावर धावणार ‘डेमो’ऐवजी ‘मेमो’ रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:20 PM2019-03-13T22:20:01+5:302019-03-13T22:20:22+5:30
गोंदिया- बल्लारशाह मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात १५ मार्चपासून बदल केल्या जाणार आहे. या मार्गावर आता पॅसेंजरऐवजी ‘मेमो’ गाड्या धावणार आहे. यामध्ये शौचालय व अन्य सुविधा नसल्यामुळे अडचण होणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गोंदिया- बल्लारशाह मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात १५ मार्चपासून बदल केल्या जाणार आहे. या मार्गावर आता पॅसेंजरऐवजी ‘मेमो’ गाड्या धावणार आहे. यामध्ये शौचालय व अन्य सुविधा नसल्यामुळे अडचण होणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
१९९६-९७ रोजी गोंदिया- बल्लारशाह नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्राँडगेजमध्ये रूपांतर झाल्यापासून रेल्वेसेवा अव्याहत सुरू आहे. सुरूवातीला काही महिने या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त करून शौचालय सुविधायुक्त गाड्या सुरू करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने या मागणी दखल घेऊन शौचालययुक्त डेमो गाड्या सुरू केल्या. सध्याच्या पॅसेंजर गाडीतही सुविधा आहेत. मात्र पॅसेंजर बंद करून त्याऐवजी नवीन मेमो गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. १५ मार्चपासून या गाड्यांची सुरूवात होणार आहे. मात्र, या गाड्या प्रवाशांसाठी असुविधाजनक असल्याची माहिती पुढे आली. अनेक ठिकाणी प्लॉटफार्मची उंची-कमी अधिक असल्याने वृद्ध व महिला प्रवाशांना गाडीत चढणे व उतरणे त्रासदायक होणार आहे. नवीन मेमो गाड्यांमध्ये पॅसेंजरपेक्षा कमी डब्बे राहणार आहेत. गोंदिया ते बल्लारशाह हे अंतर २५० किमीचे आहे. यामध्ये लहान-मोठी अनेक रेल्वेस्थानके आहेत. या स्थानकांवरून रोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेतल्यास नवीन मेमो गाड्या उपयुक्त ठरणार नाही. यातून प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे.
बल्लारशाह- गोंदिया मार्गावर सुरू होणाºया मेमो गाड्या पूर्णत: असुविधाजनक आहेत. या गाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही. डब्बे कमी असणार आहेत. प्रवासाच्या दृष्टीने उपयुक्त नसल्याने रेल्वे प्रशासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
- संजय गजपुरे
विभागीय सदस्य, रेल्वे सल्लागार समिती