मेंडकी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:02+5:302021-08-25T04:33:02+5:30
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरात मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ...
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरात मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आदी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
रामनगर टोली येथे ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधेअंतर्गत हनुमान मंदिर परिसराच्या आवारात सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. या वेळी जि.प. सदस्य प्रभाकर सेलोकर, स्मिता पारधी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प.स. सदस्य ज्ञानेश्वर कायरकर, सरपंच मंगला इरपाते, हेमराज तिडके, मंगला लोणबळे, सुनील आंबटकर, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.
रामनगर येथे २० लक्ष रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, निधी मंजूर नसताना केवळ नागरिकांना भूलथापा देण्यासाठी यापूर्वीच्या काळात तीन वेळा या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र आम्ही पहिले निधीची तरतूद केली. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळविली आणि त्यानंतर भूमिपूजन केले. आता येथे लवकरच सभागृहाचे बांधकाम करून त्याचे लोकार्पण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
बाॅक्स
इको-टुरिझम विकसित करून
ब्रह्मपुरी क्षेत्रात वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ‘इको टुरिझम’ विकसित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ. पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्त्वाचा असला तरी मानवाचा जीवसुद्धा महत्त्वाचाच आहे. माणसाने वाघाला मारले तर मानवावर गुन्हा दाखल होतो. याबाबत कायदे कडक आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढून मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्याबाबत वन विभागाला सूचना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.