कोरोनाच्या इतिहासात त्यांच्या यातनांचा उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:00 AM2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:10+5:30
काही दिवसांपूर्वीच हे कामगार हजार बाराशे किमीचे अंतर कापून परराज्यात कामावर गेले होते. या कामगारांच्या फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्यांना या कामाच्या मिळणाºया मोबदल्यातून उंची कपडे घ्यायचे नव्हते. स्वत:साठी मोठे घर बांधायचे नव्हते. फक्त त्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करायची होती. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले. कामगारांचे काम बंद झाले आहे. हातचा पैसाही संपला आहे.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : अंगाची लाहीलाही करणारे तळपते उन्ह, डोक्यावर गाठोडे आणि कडेवर मूल घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या मजुरांचे घोळकेच्या घोळके नागभीड - ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत आहेत. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवरील हे विदारक दृश्य सहृदय माणसाचे निश्चितच हृदय हेलावणारे आहे. उद्या जेव्हा कोरोनाच्या लढयाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या कामगारांनी भोगलेल्या यातनांचा त्या इतिहासात निश्चित उल्लेख असेल.
काही दिवसांपूर्वीच हे कामगार हजार बाराशे किमीचे अंतर कापून परराज्यात कामावर गेले होते. या कामगारांच्या फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्यांना या कामाच्या मिळणाऱ्या मोबदल्यातून उंची कपडे घ्यायचे नव्हते. स्वत:साठी मोठे घर बांधायचे नव्हते. फक्त त्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करायची होती. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले. कामगारांचे काम बंद झाले आहे. हातचा पैसाही संपला आहे. आता जे रखरखत्या उन्हात डोक्यावर गाठोडे आणि कडेवर मूल घेऊन वणवण भटकंती करताना दिसत आहेत. त्यापैकी कित्येक मजुरांनी नुकतीच कामाला सुरूवात केली होती. उद्या कोरोनाच्या लढ्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा कामगारांनी भोगलेल्या यातनांचा निश्चितच कुठे ना कुठे पुसटसा का असेना उल्लेख निश्चित असेल.