महापाषाणकालीन दगडी हत्यारे, शिलास्तंभ सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:59 PM2018-10-31T22:59:45+5:302018-10-31T23:00:22+5:30
गोंडपिपरी तालुक्यात महापाषाणकालीन अवशेष सापडत आहेत. तालुक्यातील किरमीरी या गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोचा संख्येने सूक्ष्म हत्यारे विखुरलेली आहे. या परिसरातील डोंगरावर दगडी हत्यारे, शिलास्तंभ आढळून आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : गोंडपिपरी तालुक्यात महापाषाणकालीन अवशेष सापडत आहेत. तालुक्यातील किरमीरी या गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोचा संख्येने सूक्ष्म हत्यारे विखुरलेली आहे. या परिसरातील डोंगरावर दगडी हत्यारे, शिलास्तंभ आढळून आली आहेत.
गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुरातत्वीय अवशेष विखुरलेले आहेत. या भागात महापाषाणकालीन मानवांचा मोठा वावर होता. तालुक्यातील डोंगरगाव, दरुर, गोंडपिपरी, तांडा या गावात शिलावर्तुळ, शिलास्तंभ, सूक्ष्म हत्यारे आढळून आली आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील प्राचीन स्थळांचा अभ्यास करणारे निलेश झाडे, अरुण झगडकर यांना किरमीरी गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोंच्या संख्येत सूक्ष्म हत्यारे आढळून आली. त्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत दगडी हातोडा, दगडी हात, कुऱ्हाड, शिलास्तंभ सापडले. या डोंगरावर साधारणता पाच हजार वर्षांपूर्वी हत्यार बनविण्याचा कारखाना होता, असा अंदाज निलेश झाडे यांनी वर्तविला आहे. या भागात तज्ज्ञांनी येऊन खोदकाम करण्याची गरज आहे.
शिलावर्तुळाचे दगड घरकामात
किरमीरी डोंगराच्या पायथ्याला महापाषाणकालीन दफनभूमी आहे. येथे अनेक शिलावर्तुळे होती. स्थानिकांनी ही शिलावर्तुळे खोदून तेथील दगड घरकामात वापरली आहे.