कोदेपारात एसआरटी धान रोवणीची पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:47 PM2018-09-02T21:47:41+5:302018-09-02T21:48:00+5:30
उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.
शशिकला माटे या नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. त्यांच्याकडे सात एकर धानाची शेती आहे. आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत होत्या. काहीतरी नवीन करावे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकरात धानाची रोवणी केली. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील वर्षी पूर्ण सातही एकरात याच पद्धतीने धानाची रोवणी करणार आहेत. या तंत्राविषयी म्हणाल्या, हे तंत्र कोकणात विकसित झाले आहे. एस.आर.टी तंत्र हे भातशेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून उत्तम भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे. यामुळे मशागत, बियाणे, मजुरी आदी खर्चात बचत होऊन उत्पादन आणि जमिनीच्या सुपिकतेमध्येही वाढ होते. या तंत्रात शेतीची मशागत व गादीवाफे एकदाच करायचे आणि मग या कायमस्वरूपी या गादीवाफ्यांवर एका मागून एक अशी फेरपालट पिके घेता येतात. या तंत्राचे अनेक फायदे आहेत. चिखलणी व लावणी न करायला लागल्यामुळे ३०-४० टक्के खर्च आणि ५० टक्के त्रास कमी होतो. चिखलणी करताना वाहून जाणाºया सुपीक मातीची धूप वाचेल व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येईल. गांडुळांची संख्या वाढते. रोपांमधील योग्य अंतरामुळे हवा खेळती राहते.
गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत राहते. गादी वाफ्यामुळे कमी पावसात पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. अती पावसात शेतात पाणी साचून राहत नाही. गादीवाफ्यावर भातपिकानंतर नांगरणी न करता फेरपालटीची पिके घेता येतात. दोन पिकांमधील मशागतीचा वेळ आणि खर्च वाचतो. एकदाच केलेले हे गादीवाफे ८-९ वर्ष वापरता येतात. हे तंत्र सर्वसामान्य शेतकºया आत्मविश्वास आणि शेतकºयांना खºया अर्थाने बलवान करणारं ठरू शकते. हे तंत्र यशस्वी झाले तर त्यातून अनेक शेतकºयांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळू शकते, असेही माटे यांनी सांगितले.